शनिवार, २७ जुलै, २०१३

नुकसानीचा सर्व्हे तात्काळ करा -पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतकांच्या वारसास 1 लाखाची मदत

               चंद्रपूर दि.27- चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीचे वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण तात्काळ  करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिका-यांना दिले.  अतिवृष्टीमुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची अतिरिक्त मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  चंद्रपुरातील संजयनगर व रहेमतनगर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
               उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम, पालकमंत्री संजय देवतळे, महापौर संगीता अमृतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, खासदार सर्वश्री हंसराज अहिर, मारोतराव कोवासे, आमदार श्रीमती शोभाताई फडणविस, आमदार सर्वश्री नानाभाऊ शामकुळे, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, अतुल देशकर, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
               चंद्रपूर जिल्हयात पुरपरिस्थिती गंभीर असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विधी मंडळाचे अधिवेशन सुरु असल्यामुळे घोषणा करणे संयुक्तिक ठरणार नाही.  मात्र विदर्भातील सर्व   जिल्हाधिका-यांना नुकसानीचा अहवाल ताबडतोब पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  त्यांचा अहवाल प्राप्त होताच या संबंधी सभागृहात घोषणा करण्यात येईल.  अतिवृष्टीने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना देण्यात येणारी दीड लाख रुपयाची मदत अपुरी असून  मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त एक लाख रुपयाची मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. 
               डब्ल्युसिएलकडून मायनिंग परवान्याचे उल्लंघन होता कामा नये अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या. नाल्याचे खोलीकरण आवश्यक असून माजी मालगुजारी तलावाचे सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाला दिल्या. ओव्हरबर्डनचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला असता मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले. ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे पात्र अरुंद झाल्याचे लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता  या संदर्भात मुंबईत बैठक घेतली जाईल,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
               शहरातील पूरप्रवण भागातील पूरग्रस्त रेषा (रेड लाईन, ब्ल्यू लाईन) संबंधी कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.  आज मुख्यत्र्यांनी  शहरातील संजय नगरातील घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना धनादेश वाटप केले.
               खासदार व सर्व आमदारांनी जिल्हयात ओला दुष्काळ घोषित करावा, नुकसानग्रस्त    शेतक-यांना सरसकट मदत करावी,  मृत्य व्यक्तींच्या वारसांना पाच लाख मदत दयावी, मोफत बीबियाणे द्यावे,  कर्ज फेडीला मुदत वाढ व चंद्रपूर पंचशताब्दीचा उर्वरित निधी तात्काळ द्यावा अशा मागण्या त्यांनी  बैठकीत केल्या.
                                                                   0000            

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून वाशिम
जिल्ह्यातील पुरपरिस्थितीचा आढावा

* अडाणच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
* कारंजा येथे शेतकरी तथा नुकसानग्रस्तांची चर्चा   

        वाशिम, दि. 27 : गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेत जमिनी खरडून गेल्या, तर पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अडाण नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना भेटून नुकसानीची माहिती घेतली त्यानंतर कारंजा येथील विश्रामगृह येथे जिल्ह्यातील नुकसाना संदर्भात आढावा घेतला.
            अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे तसेच अडाण नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेत नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम, पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री सुभाष झनक, प्रकाश डहाके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई चौधरी, विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी,यवतमाळचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, माजी खासदार अनंतराव देशमुख, हरिभाऊ राठोड, मुख्य वनसंरक्षक डी.के.त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
            कारंजा येथे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्ह्यात अतिवृष्टी तथा नद्यांना आलेल्या पूरामुळे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 3 हजार 200 हेक्टर क्षेत्रात 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख  रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळजवळ 26 किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहे. त्यासाठी 32 कोटी पेक्षा जास्त निधीची आवश्यकता  असल्याची माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत  दिली.
            पू परिस्थीतीमुळे जिल्ह्यातील 224 गावे बाधित झाली असून सुमारे नऊ हजार नागरिकांना फटका बसला आहे. बाधितांना सानुग्रह अनुदान तसेच मृतकांच्या कुंटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यावेळी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी शेत पिकांचे व घरांच्या  नुकसानीचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे,शा सूचना दिल्यात. पूरग्रस्त नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतल्या. यावेळी पाटबंधारे, कृषी, बांधकाम, वन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा