शुक्रवार, १९ जुलै, २०१३

बा विठ्ठला ! संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे -मुख्यमंत्री        
पंढरपूर.दि.19-  बा विठ्ठला! राज्य प्रगतीपथावर जाऊ दे. राज्यातील जनतेला सुख, शांती, समाधानाचे  दिवस येऊ दे. त्याचबरोबर राज्यावर येणा-या  संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे! अशी प्रार्थना विठ्ठल चरणी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नि सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली.महापूजे नंतर आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
        यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा उज्वला भालेराव, राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री  दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आ.विलास लांडे, आ.सुरेश खाडे,  मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, जि.प.अध्यक्षा  डॉ.निशिगंधा माळी, माजी.आ. उल्हासदादा पवार, पुणे विभागीय  आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थिती होते.
     गतवर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट होते. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाची स्थिती चांगली आहे.राज्यातील जलाशय भरतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पंढरपूर विकास आराखड्यातील कामे वेगाने सुरु असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.  
       या वारीसाठी येणा-या भविकाला जास्तीत-जास्त सुविधा देण्याचे  काम जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे पालकमंत्री श्री.सोपल यांनी सांगितले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने अध्यक्ष  आण्णा डांगे यांनी  मुख्यमंत्र्याचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार केला..
   यंदा जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नामदेवराव देऊबा वैद्य (वय-70) व सौ.गंगूबाई नामदेवराव वैद्य  (वय -65) यांना मुख्यमंत्री चव्हाण यांच्या समवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला. श्री वैद्य यांचा व्यवसाय शेती व मजूरीचा आहे.त्यांना 2 मुले व 2 मुली तसेच सुना व नातवंडे असून गेल्या 25 वर्षापासून ते वारीस येत आहेत. यापुर्वी त्यांच्या घरात कोणाचीही  वारीची परंपरा नव्हती.मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा सत्कार करुन, एस.टी तर्फे देण्यात येणारा मोफत प्रवास सवलतीचा वार्षिक पास त्यांना प्रदान केला. तसेच मनोज भेंडे यांच्यातर्फे 15 हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील कृष्णा कडू यांच्यातर्फे 11 हजार रुपयांचा धनादेश या मानाच्या वारक-यांना प्रदान करण्यात आला. 
       तत्पूर्वी या महापूजेसाठी पदुम मंत्री मधुकरराव चव्हाण. आ. राणा जगजीत सिंह पाटील. आ. वैजिनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते . विठ्ठल मंदिराच्या सभागृहात आटोपशीर झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम, कोल्हापूर  परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक तुकाराम चव्हाण, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार,  मंदीर समितीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब बडवे, वा.ना उत्पात, प्रा.जयंत भंडारे, वसंत पाटील, अरविंद नळगे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी बेलदार तसेच मंदीर समितीचे व्यवस्थापक एस.एस.विभूते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                                             0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा