बुधवार, १७ जुलै, २०१३

आधुनिक साधने आणि प्रशिक्षित मनुष्यबळाने सुसज्ज  आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 17 : भूकंप, वादळ, आग, त्सुनामी, आतंकवादी हल्ले यासारख्या घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. ही यंत्रणा सॅटेलाईट फोनसारख्या साधनांनी आणि प्रशिक्षित मनुष्यबळाने सुसज्ज असेल, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
उत्तराखंड आपत्तीच्या वेळी शोध व बचाव कार्यांच्या समन्वयासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मदत पथकांतील अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, राज्यमंत्री सुरेश धस, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, पर्यावरण प्रधान सचिव ए. आर. राजीव, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाचे संचालक विकास खारगे, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर, आपत्कालीन कक्ष सचिव श्रीमती आय.ए. कुंदन, जे. जे. इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, तसेच सत्कारमूर्ती व त्यांचे कुटूंबिय यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंड मदत कार्यावेळी झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले विंग कमांडर डॅरिल कॅस्टेलिनो, कॉन्स्टेबल गणेश अहिरराव, शशीकांत पवार यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्र्रातील चार पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अद्याप बेपत्ता असलेल्या १५८ यात्रेकरुंसाठी उत्तराखंड सरकारतर्फे व हवाई दलाने तीनवेळा सर्व परिसरात व्यापक शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र अद्यापही त्यांचा शोध न लागल्याने त्यांच्या कुटुबियांसोबत संपूर्ण राज्याची जनता दु:खी झाली आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांना वाचविणारी भारतीय लष्कराची उत्तराखंड येथील मोहीम आणि एअरफोर्सचे अतुलनीय काम याला तोड नाही, असे गौरवपूर्ण उद्‌गार काढून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रमाणित कार्यचालन पद्धती (एसओपी), सुसज्ज नियंत्रण कक्ष, एनडीएमएकडून निधीची उपलब्धता, मिडीया मॅनेजमेंट, सॅटेलाईट फोन, हॅम ऑपरेटर, वायरलेस यंत्रणा उभारणी तसेच प्रत्येक जिल्ह्याचे अद्ययावत नकाशे आणि त्या जिल्हयातील यात्रा कंपन्यांची यादी या बाबी प्राथम्याने पूर्ण करण्याची गरज आहे.
          संपूर्ण महिन्याभरात अक्षरश: दिवसाचे 24 तास थंडी-वाऱ्याची पर्वा न करता वेळप्रसंगी उपाशी पोटी उत्तराखंडसारख्या दूरच्या राज्यात ही मोहीम राबवून सर्व नागरिकांना सुखरुपपणे त्यांच्या घरी पोहचविणे हे अतिशय कठिण काम अत्यंत सहनशीलतेने केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या कामाची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत करण्यात येणार असून या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव वृत्तपत्रे आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कथन केल्यास राज्य शासनाने या कामी केलेल्या कार्याची माहिती लोकांना प्रत्यक्ष मिळेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
          भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी आपल्याला पूर्वनियोजन करण्याची गरज असून प्रत्येक घटना ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि नोंद घ्यावी अशी ठरते. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक अभ्यासपूर्ण व काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार असून आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण केंद्र हे दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 ही दिवस कार्यरत असणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही क्षणी आपत्ती येईल या तयारीने नियंत्रण कक्षाने पूर्णपणे समर्पित भावनेने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करावे आणि इतर एजन्सीसबरोबर समन्वय ठेवावा. आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावुन जाण्याची महाराष्ट्राची परंपराच आहे. यापुर्वी जम्मू-काश्मीर भूकंप, बिहार पूर, लडाख ढगफुटी, दक्षिण भारतातील त्सुनामी, गुजरात भूकंप, ओरिसा चक्रीवादळ अशा अनेक आपत्तींमध्ये आपण मदत व बचाव कार्याबरोबरच पुनर्वसनाचे कामही केलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, उत्तराखंड मधील आपत्ती जरी प्रथमदर्शनी नैसर्गिक वाटत असली तरी निसर्गावर अतिक्रमण करुन नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यामुळे या संकटाचे गांभीर्य वाढले ही बाब नाकारुन चालणार नाही. आपल्याकडेही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती किंवा अतिरेकी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन त्याला तोंड देण्यासाठी ‘यशदा’सारख्या संस्थेतून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे काळाची गरज आहे. तसेच अशा प्रसंगी मदत व बचाव कार्यासाठी जाणाऱ्या पथकातील प्रमुख अधिकाऱ्यांना काम करणे सुलभ व्हावे, यासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिले जातील, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री सुरेश धस यावेळी आलेले अनेक बरेवाईट अनुभव कथन केले. ते म्हणाले की, अशा आपत्तींच्या वेळी मान्यवरांचे दौरे हे स्थानिक प्रशासनाला अडचणीचे ठरतात. तथापि, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर तेथील यंत्रणा अधिक सुत्रबद्ध आणि गतिमान पद्धतीने कार्यरत झाली. श्री. चव्हाण आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या भेटीनंतर तेथील प्रशासनाने अतिशय अनुकुल प्रतिसाद दिला आणि श्री. चव्हाण यांनी केलेल्या अनेक महत्वाच्या सूचनांची तातडीने अमलबजावणी करण्यात आली. सर्वश्री ए. आर. राजीव, विकास खारगे, जे.जे इस्पितळातील डॉ. सौरभ गांधी, उपजिल्हाधिकारी मनोज रानडे, भाविक उपेंद्र थत्ते यांनी यावेळी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. हे अनुभव ऐकताना सर्वांची हृदये हेलावून गेली व डोळे पाण्याने भरुन आले.
महाराष्ट्रातून गेलेल्या मदतपथकांतील
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नावे पुढीलप्रमाणे
          आर. ए. राजीव, भाप्रसे, प्रधान सचिव, पर्यावरण विभाग ; विकास खारगे, भाप्रसे, संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम ; एस. चोकलिंगम, आयुक्त, मुद्रांक शुल्क, पुणे ; मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी ; अमृत नाटेकर, उप जिल्हाधिकारी ; नितिन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी ; राजेंद्र देगांवकर, कॅप्टन विनोदकुमार अडुकिया, निवृत्त लेफ्टनंट कर्नल, भारतीय सेना, जीएमआर एव्हीएशन ; कॅप्टन बी.टी. देशमुख, निवृत्त ग्रुप कॅप्टन, भारतीय हवाई दल, रेमंड एव्हीएशन ; जुगराजसिंग पन्नु, एयरक्राफ्ट मेटेंनन्स इंजिनियर, रेमंड एव्हीएशन ; अमनदिप सिंग, तांत्रिक रेमंड एव्हीएशन ; अक्षय मिगलानी, फ्लाईंग ऑपरेशन्स पर्सोनेल, रेमंड एव्हीएशन; नायब तहसिलदार ; शिवाजी गवळी, नायब तहसिलदार ; प्रणय जोशी, उच्चश्रेणी लघुलेखक ; राजेंद्र कनोजिया, वाहनचालक ; जगदीश उपाध्याय, लिपिक टंकलेखक ; प्रेम उपाध्याय, वाहनचालक; राजेंद्र डाकरे, असिस्टंट स्टेशन ऑफिसर ; दिलीप चव्हाण, फायरमन, नागपूर महानगरपालिका ; रुपेश शिंगारे, तहसिलदार ; किशोर कुरणे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक, औरंगाबाद; डॉ. सचिन सोलंखे, सहाय्यक प्राध्यापक ; प्रशांत कापडे, अव्वल कारकून ; डॉ. निलेश आर. भिलावे, जे. जे. रुग्णालय, मुंबई ; विलास घरटे, पुरुष पारिचालक, जे. जे. रुग्णालय, मुंबई ; अरुण बांगर, जे. जे. रुग्णालय, मुंबई ; राहूल द्विवेदी, भाप्रसे, सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंदिया ; धनंजय देशमुख, नायब तहसिलदार ; केशव कोथे, अग्निशमन अधिकारी, नागपूर महानगरपालिका ; डॉ. पवन जाधव, औरंगाबाद ; डॉ. चंद्रशेखर गायके, औरंगाबाद ; डॉ. हर्षद वासकाले, पुणे विभाग ; डॉ. किशोर पांडगांवकर, पुणे विभाग ; डॉ. वैभव पत्की, पुणे विभाग ; डॉ. हेमंत रेळकर, पुणे विभाग ; डॉ. उद्धव बोघे, पुणे विभाग ; जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी ; अमित शेडगे, नायब तहसिलदार ; मेहेंद्र हरपळकर, उपजिल्हाधिकारी ; रमेश मुनलोड, नायब तहसिलदार ; वैभव भाले, लिपिक ; डॉ. वैजनाथ राठोड, सहाय्यक प्राध्यापक, औरंगाबाद ; डॉ. मो. अब्दुल अन्सारी, सहाय्यक प्राध्यापक, औरंगाबाद ; विशाल दौंडकर, नायब तहसिलदार ; बापू मदने, विभागीय परिवहन अधिकारी ; डॉ. सौरभ गांधी, जे. जे. रुग्णालय, मुंबई; शेळके, मोटर वाहन निरीक्षक ; रवी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी, उगले, मोटर वाहन निरीक्षक ; डॉ. महेंद्र वाळवेकर, जे. जे. रुग्णालय, मुंबई ; पर्यावरण तज्ज्ञ राजेश सोनुने ; संपादन तज्ज्ञ मयुर घोडविंदे; क्षमता बांधणी व प्रशिक्षण अधिकारी श्रीदत्त संतोष कामत; आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जयदिप विसावे; प्रकल्प अधिकारी रनित चॅटर्जी; आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी श्रीरंग घोलप; सुरेश सुर्वे; स्वयंसेवक उपेंद्र थत्ते, प्रमोद विश्वासराव, बाबुराव वाळे.
000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा