सोमवार, १५ जुलै, २०१३

ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांच्या निधनाने
जुन्या पिढीचा दुवा निखळला : मुख्यमंत्री

मुंबई, दि. १५  : कोणताही आडपडदा न ठेवता लिहिलेले ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र, स्त्रीवादी लेखन आणि ३५ हून अधिक साहित्यकृती लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या नामवंत लेखिका, कवयित्री माधवी देसाई यांच्या निधनाने जुन्या पिढीचा एक दुवा निखळला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
        आपल्या शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या कन्या आणि स्वामीकार रणजीत देसाई यांच्या पत्नी असलेल्या श्रीमती माधवी देसाई या जात्याच प्रतिभावंत होत्या. त्‍यांनी या दिग्गजांच्या सहवासात राहूनही स्वत:चे स्वतंत्र स्थान प्रतिभेच्या जोरावर निर्माण केले. "नाच गं घुमा' या आत्मचरित्रामुळे माधवी देसाई मराठी साहित्य विश्‍वात चर्चेत आल्या. कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह, ललीत लेखसंग्रह अशा 35 साहित्यकृतींची निर्मिती त्यांनी केली.
गेली २० वर्षे गोव्यात वास्तव्याला असताना त्यांनी महिला संघटना स्थापन करून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. "गोमंत सौदामिनी' या पुस्तकाच्या माध्यमातून गोव्यातील विविध क्षेत्रातील शंभर महिलांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. मराठी साहित्याला आपल्या लेखनाने समृद्ध करणा-या माधवी देसाई यांचे मराठी साहित्यातील योगदान न विसरण्यासारखे आहे, असे श्री. चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
०००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा