कर्नाटकातील विजय ही आगामी निवडणुकीमधील
काँग्रेसच्या विजयाची नांदी - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 8 मे: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे जोरदार यश म्हणजे काँग्रेसच्या धोरणांवर आणि विकासाच्या अजेंड्यावर जनतेने टाकलेला विश्वास असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्ट कारभारामुळे कर्नाटकातील जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या यशाचे हे पहिले पाऊल आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त
केली आहे.
कर्नाटकातील सत्ताधारी भाजपाला जागांचे
अर्धशतकही गाठता आले नाही, यातच सर्व काही आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, युपीएच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर या निकालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात. सभागृहातील चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जाऊ शकतात. मात्र
भारतीय जनता पार्टीने वारंवार संसद बंद पाडून चर्चेचा मार्ग थांबवला आणि कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्नाटकच्या जनतेने त्यांचा डाव ओळखून काँग्रेसलाच आपली पसंती दिली. जनतेचे मन जिंकण्यात काँग्रेस यशस्वी झाली असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये यशाची ही परंपरा कायम राहील, असा विश्वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
0 0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा