शनिवार, १३ एप्रिल, २०१३


लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी
न्यायालय सक्षम करणे गरजेचे -मुख्यमंत्री
मुंबई,दि.13:- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायालय सक्षम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
            ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाटयगृहात आयोजित महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार, पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे उपस्थित होते.
            श्री.चव्हाण पुढे म्हणले की, न्यायालय आणि वकीलांचे अनेक प्रश्न आहेत. जागेचा प्रश्न, स्वच्छतागृहांचा प्रश्न, न्यायालयीन इमारतींचा प्रश्न हे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्राधान्य देईल. न्याय प्रक्रियेमध्ये ई-कोर्टचा वापर, ई-लायब्ररी, व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. न्यायालयात मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. विधी साक्षरता वाढली पाहिजे. सर्व सामान्य जनतेला न्यायालयाची भिती वाटू नये असे सांगून ते म्हणले की, वकील भवनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.
            केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले की, आज विधी मंडळात कायद्याचे पदवीधर दिसत नाहीत. अनेकजण इंजिनिअर झालेले आहेत. जर राजकारणामध्ये कायद्याचे शिक्षण घेऊन लोकप्रतिनिधी आले तर गुणवत्ता वाढेल. बार कॉन्सिलमध्ये महिला प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्याबाबत त्यांनी सूचना केली. केंद्रिय पातळीवर वकीलांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असे त्यांनी शेवटी सांगितले.
            प्रारंभी ॲङ प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकात वकील परिषदेचा उद्देश स्पष्ट करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सरकारी वकील ॲङ उज्वल निकम यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वकीलांतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेला पाच लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री यांना सुपूर्द करण्यात आला.
            या कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पालकमंत्री गणेश नाईक यांची शुभेच्छापर भाषणे झाली. यावेळी खा.संजीव नाईक, खा.आनंद परांजपे, खा. बळीराम जाधव, आ.जितेंद्र आव्हाड, आ.एकनाथ शिंदे,सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड तसेच महाराष्ट्र आणि गोव्याचे वकील मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा