रविवार, १४ एप्रिल, २०१३

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाची क्षणचित्रे

दुर्बल घटकांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याची गरज - राज्यपाल
मुंबई : दुर्गमभागात राहणाऱ्या अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, आर्थिक दृष्टया कमकुवत घटक, तसेच अल्पसंख्याक घटकाला आजच्या जागतिकीकरणाचा अद्याप लाभ झालेला नाही. त्यामुळे आज या दुर्बल घटकांना अर्थिक दृष्टया सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनाराणन यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चैत्यभूमी स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते आज चैत्यभूमी येथे करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, ग्रामविकास मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, रोजगार हमी मंत्री नितीन राऊत, अल्पसंख्यांक विकास मंत्री नसीम खान, महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री सचिन अहिर, खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे, नितीन सरदेसाई, मुंबईचे महापौर सुनिल प्रभू, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया आदी मान्यवर उपस्थित होते.
टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
राज्यपाल श्री. शंकरनारायणन म्हणाले, अनुसूचित जाती आणि मागास घटकाच्या उन्नतीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थानी, विद्यार्थी, युवक व महिला यांचे कौशल्य विकसित करणारे कार्यक्रम आयोजित करावेत. अशा कार्यक्रमामुळे त्यांच्यामध्ये उद्योजक बनण्याचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल व भविष्यात नोकरीत येणारे उद्योजक म्हणून ते नावारुपास येतील.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशास संविधानाच्या आधारावर चालविण्याची तरतूद केली. त्यामुळे आपली लोकशाही सदृढपणे उभी आहे हे त्यांचे महान कार्य म्हणावे लागेल. इंदू मिलच्या जागेवर स्मारक होण्यासाठी केंद्र सरकाने परवानगी दिली आहे. त्यासाठी  
आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उत्कृष्ट स्मारक या ठिकाणी उभे राहील. त्यांचे विचार, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना माहित व्हावे यासाठी हे स्मारक व टपाल तिकीट दिशा दर्शक ठरेल.
केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जावा यासाठी आपण हे स्मारक सर्वानी मिळून उभारुया असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी साहित्यिक नामदेव ढसाळ, तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा