सोमवार, ८ एप्रिल, २०१३

मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीत
आतापर्यंत 73 कोटी 65 लाख रुपये जमा
मुंबई, दि. 8 एप्रिल : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीत आतापर्यंत 73 कोटी 65 लाख रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 
चालू वर्षी राज्यातील काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे.  या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शासनाच्या या प्रयत्नाबरोबरच विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आणि दानशूर व्यक्तीकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विधीमंडळात आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री.अशोक पोहेकर तसेच मुख्याधिकारी श्री.डी.डी.शिरसाठ यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे 59 लाख 94 हजार 862 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला.  बँकेतर्फे ठाणे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणी 40 विंधन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष दूर झाल्याचे पोहेकर यांनी सांगितले.  यावर मुख्यमंत्र्यांनी विंधन विहिरीबरोबरच सिमेंट बंधारे उभारण्याची सूचनाही यावेळी केली.
यावेळी स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद यांच्यामार्फत 1 कोटी रुपयांचा धनादेशही दुष्काळ निधीसाठी देण्यात आला.  आमदार भाई जगताप यांनीही मुख्समंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन दुष्काळ निधिीसाठी आपले 5 महिन्याचे वेतन म्हणजेच 3 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे स्वाधीन केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री.आशीष कुमार सिंह उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा करु शकतात.  हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013) / Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती पाठविणे सोपे जाईल.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी 022-22026948 अथवा    022-22022940 या दूरध्वनी क्रमांकावर सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. तसेच ही सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा