2018 हे साई समाधी शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी
सुकाणू समिती स्थापणार - मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज
चव्हाण
शिर्डी दि.11- सन 2018 हे वर्ष साई शताब्दी
वर्ष असल्यामुळे नांदेडला केंद्र शासनाकडून जशी मदत घेण्यात आली त्याच धर्तीवर
शिर्डीसाठीही घेऊन केंद्र व राज्य शासन मिळून पूर्ण ताकदीनिशी श्रीसाई शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या
अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्माण करुन कामाला सुरुवात करण्यात येईल असे
प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शिर्डी
येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व चेन्नई येथील दानशूर साईभक्त
के.व्ही.रमणी यांच्या शिर्डी साई ट्रस्टच्यावतीने सुमारे ७० कोटी रुपये खर्च करुन
उभारण्यात आलेल्या साई आश्रम भक्तनिवास टप्पा १ चे उद्घाटन मुख्यमंत्री
श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झाले
यावेळी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषि व
पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव
पाचपुते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी
केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय रस्ते वाहतुक राज्यमंत्री सर्वेय सत्यनारायण,
खा. भाऊसाहेब वाकचौरे, चेन्नई येथील शिर्डी साई ट्रस्टचे संस्थापक व कार्यकारी
विश्वस्त के.व्ही.रमणी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व्ही.एल.अचलिया, जिल्हा
परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, आ.जयंत ससाणे, आ. भाऊसाहेब
कांबळे, आ.अशोक काळे, शिर्डी च्या नगराध्यक्ष
सौ.सुमित्रा कोते पाटील, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, संस्थानचे अध्यक्ष तथा
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश जयंत कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार, मुख्य
कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, संस्थानचे
कार्यकारी अधिकारी किशोर मोरे, उप कार्यकारी अधिकारी डॉ.माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
मुख्यमंत्री
पुढे म्हणाले की, राज्य भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. सलग 2-3 वर्षा पासून पाऊस
नाही. जलाशये कोरडी पडलेली आहेत. पिण्याचे पाणी आणि चा-याचा प्रश्न कठिण झाला आहे.
टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. राज्यातील १५ जिल्हयात दुष्काळ आहे.
यामध्ये सर्वात सक्षम व्यवस्था अहमदनगर जिल्हयात उभी करण्यात आली आहे. मागेल त्याला
काम आणि चारा देण्यात येत आहे.
श्रीसाईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी 25 कोटी रुपये दिलेत त्याबद्दल धन्यवाद
व्यक्त करुन
दुष्काळग्रस्तांचे कायमस्वरुपी अश्रू पुसण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल असे
सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ येऊच नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर सिमेंट बंधारे, ओढे, नाले, खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण
असे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
शेततळ्यातील पाणी अत्यंत जपून वापरण्याची गरज आहे. उपलब्ध पाण्याचा
काटकसरीने वापर करण्यासाठी पुढील ३ वर्षात ऊस ठिबक पद्धतीने घ्यावा म्हणजे उत्पादन
वाढीबरोबरच पाण्याचीही बचत होईल. राज्यात आता शास्त्रोक्त पद्धतीने पाणी वापर
करण्याची गरज असून केवळ १८ टक्के जमिनीला शाश्वत सिंचन आहे याकडे त्यांनी लक्ष
वेधले.
साई आश्रम उभा करण्यास उद्योजक के.व्ही.रमणी
यांनी सामाजिक दायित्व स्वीकारुन सामाजिक ऋण फेडण्यासाठी मोठी मदत केली त्याबद्दल
रमणी यांचे मुख्यमंत्री महोदयांनी आभार मानले. श्री.रमणी यांच्या दानशुरपणाचा आदर्श घेवून इतर उद्योजकही सामाजिक ऋण
फेडण्यासाठी प्रवृत्त होतील. अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिर्डी विकासाच्या संदर्भातील रस्ते विकास,
गोदावरी उजवा तट कालवा असे विकासाचे प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेवू
असेही ते म्हणाले. शासनाने क्रांतीकारी निर्णय घेवून खंडकरी शेतक-यांना जमिनी
देण्याचा निर्णय घेतला. या कामात काही अडचणी असतील तर महसूल विभाग त्यावर आवश्यक
निर्णय घेईल. दुष्काळाची परिस्थिती असलीतरी निळवंडे धरण पूर्ण करण्याची गरज आहे.
विविध मार्गाने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही मुख्यमंत्री
म्हणाले.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
उपस्थितांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.पुढील वर्षी भरपूर पाऊस पडू दे अशी
प्रार्थना केली. सन 2018 हे वर्ष साई शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टिने
मुख्यमंत्री महोदयांनी समिती नेमून पावले उचलावीत, पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी
करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी कपात करावे, फळबागा आणि पिण्यासाठी
गोदावरीतून आवर्तन देण्याचा निर्णय घ्यावा, निळवंडेसाठी विशेष धोरण आखून पाणी
द्यावे, खंडक्-यांचा प्रश्न सुटावा असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही
2018 च्या साई शताब्दी वर्षाचे नियोजन करुन अधिक निधी मिळावा असे सांगून उद्योजक
रमणी यांचे आभार मानले. यावेळी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री सर्वेय सत्यनारायण
यांचेही समयोचित भाषण झाले.
उद्योजक
के.व्ही.रमणी म्हणाले की, साईबाबांनी माझ्या आयुष्यात सर्व काही दिले आहे. ६
वर्षापूर्वी आलो असता येथील साईभक्तांची निवासस्थानाची गरज लक्षात घेवून
संस्थानच्या मदतीने हा प्रकल्प उभारला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते
श्री.रमणी यांचा मानपत्र व साईमुर्ती देऊन गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी संस्थानकडून २५ कोटी मदत
संस्थानचे
अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश जयंत कुलकर्णी यांनी श्रीसाईबाबा
संस्थानचयावतीने मुख्यमंत्री निधीसाठी २५ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना
संपूर्द केला. उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात संस्थानच्या विविध उपक्रमाची
माहिती दिली. पुढील काळात साईभक्तांसाठी मोफत जेवण, भुयारी मार्ग, शैक्षणिक संकुल,
निळवंडे धरणातून शिर्डीस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी बाबतची माहिती दिली.
साई आश्रमाची वैशिष्ट्ये
साईआश्रम टप्पा १ हा भक्तनिवास प्रकल्प
शिर्डी हद्दितील सर्व्हे नंबर 107,108,व 109 पैकी 5 हेक्टर 80 आर जागेत आहे. या अंतर्गत १२ इमारती
असून एकूण 1536 खोल्या आहेत. या ठिकाणी सुमारे 6 हजार 144 भाविकांची एकाचवेळी
निवासाची व्यवस्था होईल. या प्रकल्पात स्वतंत्र प्रसाधने व उपहार गृह असून कीर्तन,
भजन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २ हजार भाविकांना बसता येईल असे स्वतंत्र
खुले नाट्यगृह उभारण्यात आलेले आहे.
या
भक्त निवासस्थानामध्ये भाविकांना आल्हाददायक व प्रसन्न वातावरणाचा आनंद घेता यावा
यासाठी आकर्षक लॅण्डस्केपिंग करुन विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत. या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनासाठी वाहनतळाची
व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांच्या बहुविध
उपयोगासाठी रिसायकलिंग सिस्टिमही बसविण्यात आली आहे. या प्रकल्पातील सर्व
खोल्यांमध्ये गरम पाण्यासाठी सौरऊर्जा सयत्र बसविण्यात आली आहे. श्री.साईबाबा
संस्थानने या प्रकल्पातील रस्ते, पादचारी मार्ग, वीज, पथदिवे, पाणीपुरवठा आदि
सुविधांसाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च केले आहे.
टप्पा 2
साई
आश्रमाच्या प्रस्तावित टप्पा २ मध्ये १9 एकर हून अधिक जमिनीवर 6 इमारतींमध्ये 192
डॉरमेटरी हॉल असतील त्यामधून 3456 भक्तांची निवास व्यवस्था होईल. हा प्रकल्प
निमगाव को-हाळे येथे उभा राहील. येथे अंतर्गत रस्ते, वाहनतळ, सौर ऊर्जा पाणी
प्रकल्प, पाणी शुध्दीकरण प्रकल्प, सुरक्षा कक्ष, जनरेटर कक्ष, इलेक्ट्रीक सब स्टेशन,
लिफ्ट आदी सुविधा होतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा