शुक्रवार, ८ मार्च, २०१३

 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्‍ते पुलगाव येथील नगरपरिषदेच्‍या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि पुलगावच्‍या ग्रामीण रुग्‍णालय, बाह्य रुग्‍ण इमारतीचे आज उदघाटन  झाले. यावेळी   सार्वजनिक आरोग्‍य  व कुटूंब कल्‍याण मंत्री  सुरेश शेट्टी, वित्‍त व नियोजन राज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक, सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे, खासदार दत्‍ता मेघे आदी मान्‍यवर उपस्थित होते.



विदर्भाच्‍या विकासाचा समतोल साधणार -पृथ्‍वीराज  चव्हाण
       * वर्धा  जिल्‍हा परिषदेच्‍या नवीन  इमारतीचे लोकार्पण 
       * गांधीजींच्‍या विचारांच्या प्रसारासाठी  150 कोटी रुपयांचा आराखडा
       * नागपूर-अमरावती-वर्धा औद्योगिक विकासाचा त्रिकोण
       * राजीव गांधी  जीवनदायी आरोग्‍य  योजना संपूर्ण राज्‍यात
       * राज्‍यात  इमरजन्‍सी मेडीकल रिस्‍पॉन्‍स योजना
       * सिंचनाच्‍या अपूर्ण कामांना प्राधान्‍य
      वर्धा, दि. 7 :  विदर्भाच्‍या औद्योगिक विकासाला चालना देण्‍यासोबतच  सिंचन, कापसावरील प्रक्रिया उद्योग व नागरी सुविधा निर्माण करुन  विदर्भाच्‍या सर्वांगीण विकासाला  प्राधान्‍य  देण्‍यात येईल, अशी ग्‍वाही  मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण  यांनी आज वर्धा जिल्‍हा  परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय भवनाच्‍या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली.
            वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा, वर्धा  उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय मारत तसेच सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या  इमारतीचे भूमिपूजन  मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण  यांच्‍या हस्‍ते  झाले. त्‍याप्रसंगी   ते बोलत होते.
            अध्‍यक्षस्‍थानी  ग्रामविकास मंत्री  जयंत पाटील होते. तर  प्रमुख पाहुणे म्‍हणून आरोग्‍य मंत्री  सुरेश शेट्टी , पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता तसेच सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे, पालकमंत्री राजेंद्र मुळक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष  आमदार सुरेश देशमुख, खासदार दत्‍ता  मेघे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर  ढगे, आमदार अशोक शिंदे, विभागीय  आयुक्‍त  वेणू गोपाल रेड्डी  आदी  यावेळी उपस्थित होते.
            विदर्भाच्‍या  औद्योगिक  विकासाची उद्योजकांना  माहिती  देण्‍यासोबतच रोजगाराच्‍या  संधी  निर्माण करण्‍याला  प्राधान्‍य  असल्‍याचे सांगतांना मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण  म्‍हणाले, नागपूर-वर्धा-अमरावती  औद्योगिक विकासाचा  त्रिकोण  तयार करून विदर्भात  मोठ्या प्रमाणात उद्योग सुरु व्‍हावेत, यासाठी  नागरी सुविधा सोबत सर्वांगीण विकासाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.
            सेवाग्राम-वर्धा राष्‍ट्रीय तीर्थक्षेत्र असल्‍याचे  सांगतांना मुख्‍यमंत्री  म्‍हणाले, सेवाग्राम  आश्रमाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्त   150 कोटी  रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करुन गांधीजींच्‍या  विचारांचा देशपातळीवर  प्रसार करण्‍यात येईल, अशी  घोषणाही  यावेळी  मुख्‍यमंत्र्यांनी  केली.
            जनतेला अत्‍यंत अल्‍पावधीत  आरोग्‍य  सुविधा उपलब्‍ध  व्हाव्यात म्हणून इमरजन्‍सी  मेडिकल  रिस्‍पॉन्‍स  योजना राज्‍यात  राबविण्‍यात येणार आहे. अत्‍याधुनिक  सुविधा असलेल्‍या  एक हजार रुग्‍णवाहिका  उपलब्‍ध  करुन  देण्‍यात येणार आहेत. या रुग्णवाहिकेमुळे अपघात  अथवा हृदयरुग्‍णांसाठी  तात्‍काळ सेवा  उपलब्‍ध  होतील. आरोग्य सुविधेचा बृहत आराखडा तयार केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.                                       
            अध्‍यक्षीय  भाषणात ग्रामविकास मंत्री  जयंत पाटील  म्हणाले,  ग्रामीण  भागासाठीच्या  योजनांची  प्रभावी अंमलबजावणी  होण्‍यासाठी  जिल्‍हा  परिषदेच्या सुसज्ज इमारती  बांधण्‍यात  येत असून चांगल्‍या  व आदर्श योजना राबविण्याची  परंपरा यापुढेही  सुरु राहील. राज्यातील सर्व  ग्रामपंचायती  संगणकाने  जोडण्‍यात येत असून, जनतेला 19 प्रकारची प्रमाणपत्रे  गावातच उपलब्‍ध  करुन  देण्‍यात  येत  असल्‍याचेही   त्‍यांनी  यावेळी   सांगितले.
            पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  यांनी  शेतीवर जाण्यासाठी व शेतातील मालाची वाहतूक करणे सोईचे व्हावे म्हणून पांधन रस्‍ते मुक्‍त करण्‍याचा  कार्यक्रम  राबवावा, असे सांगितले.  
            प्रारंभी  मुख्‍यमंत्री  पृथ्‍वीराज चव्‍हाण  यांनी जिल्‍हा  परिषद  प्रशासकीय भवनाचे  लोकार्पण  तसेच  सामान्‍य  रुग्‍णालय इमारत , उपविभागीय  महसूल  अधिकारी  व तहसील कार्यालय  इमारतीच्‍या  कोनशिलेचे अनावरण केले.
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा