शनिवार, ९ मार्च, २०१३



ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याची ई-लर्निंग उपक्रमामध्ये ताकद - मुख्यमंत्री
          कोल्हापूर दि. 9 :  ई-लर्निंग उपक्रमामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
          जिल्हा परिषदेच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या महिला सदस्यांना संगणक प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण मेळावा, राजर्षि शाहू पुरस्कार वितरण, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण, ई-लर्निंग कार्यकम जलसाक्षरता अभियान शुभारंभ पुस्तिका प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, महापौर जयश्री सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
          आजच्या  युगात संगणक शिक्षण काळाची गरज असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महिला सदस्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी राबविण्यात येत असेली ई-लर्निग योजना ही नाविण्यपूर्ण योजना असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, या योजनेमुळे महिला सदस्यांना अनेक योजनांची घरबसल्या माहिती मिळणार आहे. सर्व क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना यशस्वी करण्यात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद ही आघाडीवर काम करणारी जिल्हा परिषद असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जिल्हा परिषदेने केंद्र राज्याच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविल्या आहेत.

          राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळी परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी राज्य शासन तयार असल्याचे ते म्हणाले.  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई  हा गंभीर प्रश्न असून याबाबत पाण्याचा प्रथम स्त्रोत आटल्यास द्वितीय तृतीय पर्यायी स्त्रोत आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम देण्यात येत आहे. योजनेच्या कामावरील मजुरीमध्ये वाढ करण्यात आली  आहे. ही वाढ 145 रुपये वरुन आता 162 रुपये इतकी करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          ते पुढे म्हणाले, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी शासनामार्फत राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून गंभीर आजार असणाऱ्यास मदत करण्यात येत आहे. राज्यात 8 जिल्ह्यात ही योजना सुरु असून लवकरच ती संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला त्वरीत त्याचा रक्त गट असलेले रक्त मिळावे यासाठी शासनामार्फत जीवन अमृत योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजनाही लवकरच संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे. गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोच करण्यासाठी मोबाईल ऍ़ब्युलन्स सेवा योजना राबविण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ योजनेतून मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
         कोल्हापूर जिल्हा परिषदेने दुष्काळी निधीसाठी एक दिवसाचे वेतन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले.

          पालकमंत्री  हर्षवर्धन पाटील म्हणालेविकास कामात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने केंद्र राज्य शासनाच्या योजना सामान्य माणासापर्यन्त पोहोचविण्याचे भरीव काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा विकासाच्या सर्व क्षेत्रात पुढे असून वीज गळती प्रमाण रोखण्यात वीज बील वसुलीमध्ये जिल्हा राज्यात पुढे आहे.
          गृहराज्यमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील एक हजार गावे निर्मलग्राम झाली असून गतवर्षी पर्यावरण संतुलन योजनेतून 31 कोटी यावर्षी 37 कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील पंचायत समितींच्या अद्ययावत इमारती उभारण्याचे काम सुरु असून येत्या 3 वर्षात ही कामे पूर्ण होतील. या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय करण्यात आली असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
                   
00000


                                                         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा