रविवार, २४ मार्च, २०१३


उद्योग क्षेत्रातील संशोधनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - राष्ट्रपती
            मुंबई, दि. 23: देशातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या संशोधन कार्यासाठी उद्योग समुह आणि तांत्रिक क्षेत्रात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी एकत्रित पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज येथे केले. 
            बिझिनेस स्टँडर्ड दैनिकातर्फे आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  या समारंभास राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बिझिनेस स्टँडर्डचे संपादक अशोक भट्टाचार्य आदी उपस्थित होते.  
            राष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आर्थिक सुधारणेच्या क्षेत्रात बिझिनेस स्टँडर्ड दैनिक महत्वाची भूमिका बजावत आहे.   21व्या शतकात आर्थिक सुधारणा होत असून, सध्या जागतिक स्तरावर मंदीचे वातावरण आहे.  या वातावरणातही आपली अर्थव्यवस्था टिकून आहे.  गेल्या दोन-तीन वर्षापासून आपल्या देशातील विकासदरात सुधारणा होत असून येत्या एक-दोन वर्षात त्यात आणखी वाढ होईल, असेही राष्ट्रपतींनी सांगितले. देशातील दारिद्रय रेषेखालील लोकांची संख्या मोठी असून त्यांच्या विकासासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.  शिक्षणाचा अधिकार, रोजगार आणि अन्न  सुरक्षा हे देशाच्या विकासाचे तीन महत्वाचे घटक आहेत.
            यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हे औद्योगिक विकासात देशातील आघाडीचे राज्य असून, वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी राज्यात चांगल्या संधी आहेत.  लवकरच विकसित होणाऱ्या  दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरमुळे उद्योगाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.  सध्या राज्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठ्यासाठी राज्यशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  या भागातील जनतेला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी उद्योगक्षेत्रानेही पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.    
            यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महेंद्रा ॲण्ड महेंद्रा, पेज इंडस्ट्रीज, बोश, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या औद्योगिक आस्थापना आणि सचिन पडवळ, प्रशांत जैन, डॉ. वाय.के. हमीद, एन.जी. मल्ल्या आणि भास्कर भट्ट यांना वैयक्तिक स्वरुपाचे पुरस्कार देण्यात आले.  
000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा