रविवार, २४ मार्च, २०१३

 स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न
        यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही प्रेरणादायी - राष्ट्रपती
मुंबई, दि. २३ :देशावर वेळोवेळी आलेल्या संकटांच्यावेळी यशवंतराव चव्हाण देशाच्या मदतीला धावून आले. त्यांचे कणखर नेतृत्व, कौशल्यपूर्ण कार्यपद्धती महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आजही प्रेरणादायी ठरली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रण मुखर्जी यांनी आज येथे काढले.
            आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा येथील एनसीपीए सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या शानदार सोहळ्यास राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय राज्यमंत्री तारीक अन्वर, मिलिंद देवरा, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार विजेते ई श्रीधरन, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर आदी यावेळी उपस्थित होते.
            राष्ट्रपती पुढे म्हणाले, देशाच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय पातळीवर संरक्षण, गृह, वित्त आणि परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे ते देशातील एकमेव व्यक्ती होते, असा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या चार महत्वाच्या पदांवर काम करताना अवलंबलेल्या कार्यपद्धतीमुळे देशावर आलेले परकीय आक्रमण असो की आर्थिक संकट असो त्यातून मार्ग काढण्याचे काम यशवंतरावांनी केले. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांची कारकीर्द ही भारतीय संसदीय इतिहासात उल्लेखनीय राहिली आहे. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी संस्मरणीय ठरली. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी केलेले कार्य देशाला आजही मार्गदर्शक आहे.
            यशवंतराव चव्हाण देशाचे अर्थमंत्री असताना मला त्यांच्या समवेत राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद वाटतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना त्यांनी घेतलेल्या निर्णयातून या राज्याची जडणघडण झाली आहे. म्हणून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ही त्यांना दिलेली उपाधी सार्थ ठरते, असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून आदरांजली अर्पण केली.
            राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले, पंचायतराज पद्धतीचे यशवंतरावांनी बळकटीकर करून सामान्य माणसाला पाठबळ दिले. सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला दिशा दिली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा विकास घडवून आणला.
            यशंवतराव चव्हाण यांच्या स्मृतिला अभिवादन करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, यशवंतरावांनी आखून दिलेल्या मार्गावर राज्याचे मार्गक्रमण सुरु आहे.  प्रशासन व शासनाच्या राजकीय बाजूंचा संगम झाला तर त्याचा फायदा नागरिकांना होतो त्यातून सर्वांर्थाने समर्थ लोकशाही उभी राहते आणि समाज सामर्थ्यवान होतो ही यशवंतरावांची धारणा होती. लोकशाहीचे असे नेमकेपण त्यांनी सांगितले आहे.  राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना यशवंतरावांनी शेती, उद्योग, बेरोजगारी या बाबींकडे लक्ष वेधले.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.  त्यांनी रचलेल्या या पायामुळे राज्य आज देशात उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे.  स्थानिक स्वराज संस्थांचे महत्व ओळखून त्यांनी पंचायतराज व्यवस्थेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी दिली.  यशवंतरावांच्या विचारांची शिदोरी आपल्या पदरी असल्याने त्यांनी दर्शविलेल्या दिशेकडे राज्याची वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
            केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले, सामान्य कुटुंबात जन्मलेले यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा विकास करण्यासाठी औद्योगिक धोरणाची पायाभरणी केली.  लोकांसाठी प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी ठेवला आहे.  त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्य प्रगत कसे होईल याची खबरदारी घेतानाच राज्याची आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम त्यांनी केले.  प्रशासन व  लोकप्रतिनीधी हे एका गाडीची दोन चाकं आहेत.  यातील एक चाक जरी निखळलं तर राज्याचा विकास खुंटतो याची जाण असली पाहिजे. लोकप्रतिनिधिंनी यशवंतरावांच्या कार्याचे स्मरण करीत विनम्रपणे वागले पाहिजे.  असेही श्री पवार यावेळी म्हणाले.
            केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले, ज्याला भविष्य, राष्ट्र  घडवायचे असते त्याचा विचार कोणीही रोखू शकत नाही यातले यशवंतराव होते.  त्यांनी पारतंत्र्यात अडकलेल्या महाराष्ट्राला एक विचार दिला.  राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेची ताकद हे यशवंतरावांच मोठ कार्य होतं आज त्यांच्या सामाजिक समतेचा विचार हा महत्वाचा आहे.  त्यांच्या या समाजिक समतेच्या विचाराला घेऊन जर आपण आपले कार्य केले तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे स्मरण होईल.
            उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले, प्रशासन कशाप्रकारे सांभाळायचे आणि राज्याचा विकास कसा करायचा याबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अनेक दाखले दिले आहेत.  श्री. चव्हाण यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वत:चा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. आणि राजकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. हा आदर्श राजकीय क्षेत्रात  काम करताना लोक प्रतिनिधींनी व इतर घटकांनी कशा प्रकारे वागावे यासाठी यशवंतराव चव्हाणांचे स्मरण करून आदर्श समोर ठेवला तर कोणतीही चूक होणार नाही, असेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
            राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनी प्रास्ताविक केले.  सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करण्यात आले.   यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रोचे शिल्पकार अभियंता ई श्रीधरन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  5 लाख रूपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  टपाल खात्याने तयार केलेल्या यशवंतराव चव्हाणांवरील पोष्टाच्या विशेष लिफाफ्याचे अनावरण आणि कृष्णाकाठ या यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राच्या ऑडिओबुकचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.  तसेच आर.डी. प्रधान यांच्या यशवंतरावांवरील पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.  यशवंतरावांचे जीवनचरित्र उलगडून दाखविणारा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला. 
            यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार विजेते ई श्रीधरन यांनी पुरस्कारात मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी आपण अर्पित करीत असल्याचे मनोगतात सांगितले.  यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. काकोडकर यांचेही यावेळी भाषण झाले.  सोहळ्यास राज्यमंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  राजशिष्टाचार राज्यमंत्री फौजिया खान यांनी आभार मानले.  सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा