शुक्रवार, १५ मार्च, २०१३


वडार समाजाच्या विविध प्रश्न, मागण्यांबाबत
सहानुभूतीपूर्वक विचार करू - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : राज्यातील वडार समाजाच्या विविध प्रश्न आणि मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करु, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष मुकुंदराव पोवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर विविध मागण्या सादर केल्या. यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार माणिकराव ठाकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, सहकार सचिव राजगोपाल देवरा, कामगार सचिव बी. एस. मुंडे आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन सादर केले. या  मागण्या  अशा : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळावर वडार समाजाच्या व्यक्तिस उपाध्यक्ष किंवा संचालक म्हणून नेमणे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळामार्फत वडार समाजाला कर्जासाठी प्राधान्य देणे, वडार समाजासह सर्व भटक्या जमातींना तांडावस्ती सुधार योजना लागू करणे, वडार समाजाच्या महिलांना दगड फोडण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार द्यावा, वडार समाजासह विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना वसंतराव नाईक स्वाभिमान व सबळीकरण योजना लागू करावी, वडार समाजाच्या खाण मजूर संस्थांना दहा लाख रूपयांपुढील कामे मिळण्यासाठी ई-टेंडरींगचे प्रशिक्षण देऊन निविदा सादर करण्यामध्ये शासनाने मदत करावी, वडार समाज हा एका ठिकाणी स्थायिक नसल्याने त्यांना जातीचे दाखले मिळण्यामध्ये अडचणी येत असतात, यासाठी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यामार्फत शिबिराचे आयोजन करून जातीचे दाखले द्यावेत.
यावेळी सर्वश्री भरत विटकर, रामचंद्र नलवडे, भिमराव नलवडे, लक्ष्मण धोत्रे, सुरेश आलकुंटे, सतीश मुरकुरे, राजू पोवार, वसंत शामराव गुंजाळ, प्रा. डॉ. महादेव देशमुख, अरूण हेरवाडे, राजेश ननवरे, गोरख शिंदे, चंदर मुधळ, विष्णू गायकवाड, हरीश बंडीवडार, पोपटराव शिंदे आदी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा