एस.टी. कामगारांना भरघोस पगारवाढीची
मुख्यमंत्र्यांची भेट
वाहकाच्या वेतनात 70 टक्के, चालकाच्या
वेतनात 51 टक्के वाढ
2012 ते
16 च्या करार कालावधीसाठी
1668
कोटी रु.च्या वेतनवाढीला मान्यता
मुंबई, दि. 2: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या कामगारांच्या सन 2012-2016 या चार वर्षांच्या करार कालावधीसाठी एकुण
1668 कोटी रुपयांच्या भरघोस वेतनवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज मान्यता दिली. यामुळे
कनिष्ठ वेतन श्रेणीतील वाहकांच्या वेतनात 70 टक्के, चालकांच्या
वेतनात 51 टक्के, सहाय्यकांच्या वेतनात 53 टक्के तर लिपीकाच्या वेतनात 44 टक्के
वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
आज महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत श्री.
चव्हाण यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार
जैन, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा, महामंडळाचे उपाध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी रवींद्र
धोंगडे, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटणीस
हनुमंत ताटे आदी उपस्थित होते.
2012-2016 या चार वर्षाच्या करार
कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून साधारणत: एकुण 1244 कोटी
वाढीचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. मुख्यमंत्री श्री चव्हाण यांनी संघटनेच्या
शिष्टमंडळाशी अत्यंत सखोल चर्चा करुन 2012-2016 या चार वर्षाच्या करारासाठी एकुण
1668 कोटी रुपयांच्या वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या
प्रस्तावाचे तुलनेत शासन स्तरावर 424 कोटी वाढवण्यात आले. कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी मा. मुख्यमंत्री
महोदयांनी 5 वर्षावरुन 3 वर्षे करण्यास मान्यता दिली.
जुलै
2010 पासून मार्च 2012 या कालावधीत किमान वेतन व रा.प. महामंडळाने दिलेले वेतन
यातील फरक देण्याचा निर्णय झाला. हा फरक
टप्प्या टप्प्याने अदा केला जाईल. सुधारीत
कनिष्ठ वेतन श्रेणीचे किमान टप्प्यावर 10 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कनिष्ठ वेतन श्रेणीतील वाहकांचे मासिक वेतन अंदाजे
3500 रुपयांनी, कनिष्ठ वेतन श्रेणीतील चालकांचे मासिक वेतन अंदाजे 3000 रुपयांनी,
तर सहाय्यकांचे व लिपीकांचे मासिक वेतन अंदाजे 2500 रुपयांनी वाढणार आहे. मार्ग
भत्ता वगळता उर्वरीत सर्व भत्ते सद्याच्या दराच्या तुलनेत दीडपटीपेक्षा जास्त
करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे भत्ते कनिष्ठ वेतन श्रेणीच्या कर्मचा-यांना
नियमीत वेतन श्रेणीच्या कर्मचा-याचे इतक्याच दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा