ब्रिटनचे
पंतप्रधान – मुख्यमंत्री भेट
मुंबईसह
महाराष्ट्रातील शहरांची नव्या पध्दतीने
उभारणी
करण्यात ब्रिटनचे योगदान
मुंबई
दि.18 फेब्रुवारी: भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान
डेव्हीड कॅमरॉन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज मुंबई तसेच
महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांचा नव्या पध्दतीने विकास करण्यावर चर्चा झाली.
यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी
महाराष्ट्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली आणि
याबद्धल कौतुक केले.
पंतप्रधान डेव्हीड कॅमरॉन यांच्यासमवेत
ब्रिटनमधील एक मोठे व्यापारी शिष्टमंडळ मुंबईत आले असून त्यात आर्किटेक्टस्, नगर
रचनाकार, वित्तीय तज्ञ यांचा समावेश आहे.
हॉटेल ताज येथील गोल्डन रुम येथे
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात 15 ते 20 मिनिटे भेट झाली. त्याचप्रमाणे मुंबई
-बंगलोर या 600 मैल कॉरीडॉरच्या उभारणीत येणाऱ्या विविध शहरांमध्ये नव्याने
पायाभूत सुविधांची उभारणी करणे, मुंबईतील मेट्रो रेल्वेचा विस्तार करणे,
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर त्याचप्रमाणे नवी मुंबईतील विमानतळ, एमटीएचएल
अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी समाधान
व्यक्त करतांना सांगितले की, डेव्हीड कॅमरॉन यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रात
गुंतवणूकीची इच्छा व्यक्त करुन एक प्रकारे येथील विकासावर शिक्कामोर्तबच केले आहे.
महाराष्ट्र हा उद्योग गुंतवणूकीत आजही देशात क्रमांक एकवर असून त्याविषयी
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कौतुक केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
00000
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा