गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची बैठक
राज्यातील दुष्काळासह इतर प्रश्नांवर केंद्राकडे
पाठपुरावा करण्याचे सर्वपक्षीय खासदारांचे आश्वासन
राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी भरीव तरतूद : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून पुढील पाच ते सहा महिने आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे, ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी मोठी तरतूद करण्यात येईल, त्यातून प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि जनावरे जगविण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्य शासनाच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील संसद सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयेाजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सुमारे साडेचार तास चाललेल्या या बैठकीत दुष्काळासह राज्याच्या इतर अनेक प्रलंबित प्रस्तावांसदर्भात खासदारांनी चर्चा केली, त्याचप्रमाणे राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे केंद्राकडे जोर लावण्यात येईल, असे बैठकीत आश्वस्त केले. या बैठकीस केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलींद देवरा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह 37 खासदार उपस्थित होते.
बैठकीस मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासन दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडून देखील वेळोवेळी या संदर्भातील मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. मराठवाडा त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील दुष्काळाची परिस्थिती फार गंभीर आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये यादुष्टीने भरीव तरतूद करून दुष्काळाशी सामना करण्यात येईल.
उद्योग-गुंतवणूकीस अधिक आकर्षित करण्यासाठी नव्या उद्योग धोरणामध्ये अनेक योजनांचा समावेश केला असून येत्या 25 व 26 फेब्रुवारीला नागपूरात ॲडव्हॉटेज विदर्भ ही परिषद देखील घेण्यात येणार आहे. यात विदर्भातील उद्योग, पर्यटन यासारख्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे दहा हजार कोटींची क्रॉस सबसिडी देण्यात येते. त्यासाठी उद्योगांवर भार पडतो. मात्र राज्यात उद्योगांना 24 तास वीज दिली जाते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवार यांच्या सुचना
केंद्रीय शरद पवार यांनी यावेळी बोलतांना, प्रामुख्याने दुष्काळाच्या बाबतीत काही सुचना केल्या. यात प्रामुख्याने मुंबईमध्ये स्थलांतरीत होऊन येणाऱ्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना तात्पुरते रेशनकार्ड द्यावे, चारा छावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात विविध संस्था व कारखाने पुढे आले आहेत, मात्र मराठवाड्यात दुर्देवाने हे चित्र दिसत नाही, त्यासाठी गावांना, युवकांच्या गटांना अशा छावण्या सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, रोजगार हमी योजनेचे वेतन सुधारीत करावे, (केरळमध्ये 390 रूपये मजूरी प्रतिदिन दिली जाते. महाराष्ट्रात ती 145 रूपये प्रतिदिन एवढी आहे.) चारा छावण्या सुरू ठेवण्याची मुदत वाढवावी, पिकाला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात यांचा समावेश आहे.
दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यात राजकारण नको, मुंबईने पुढाकार घ्यावा
शरद पवार यांनी यावेळी दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यात कोणीही राजकारण करू नये, तसेच हे संकट संपूर्ण राज्यावरील आहे, या भावनेतून मदत करावी, अशा सूचना खासदारांना केल्या. ते म्हणाले की, कदाचित जुलैपर्यंत दुष्काळाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, पुणे, नगर येथील धरणांच्या वरच्या भागात पुरेसे पाणी आहे, हे पाणी तहानलेल्या भागाला देण्यामध्ये कोणीही हात आखडता घेऊ नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यात कमी पडलो तर कदाचित जनावरे दगावतील आणि याचा परिणाम महाराष्ट्राच्या प्रतिमेवर होईल, अशी भिती शरद पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई आणि महाराष्ट्राने उर्वरीत देशावर आलेल्या संकटांच्यावेळी भरभरून मदत केली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर आता मुंबईने देखील पुढे येऊन मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
..........................................................................
उद्योगात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे
खासदार पियुष गोयल यांनी बोलताना महाराष्ट्र हा गुजरातच्या तुलनेत उद्योगात मागे असल्याचा उल्लेख केला. तोच धागा पुढे पकडून श्री. शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, कदाचित गुजरातचे मार्केटींग आपल्यापेक्षा चांगले असेल, मात्र महाराष्ट्र हा सर्वार्थाने आजही उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने क्रमांक एकचे राज्य आहे. राज्याच्या प्रयत्नांमुळे उद्योगांना आवश्यक ते वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीचा ओघ महाराष्ट्रात येत आहे. ही समाधानाची बाब आहे.
...........................................................................
यावेळी खासदार सर्वश्री हंसराज अहिर, श्रीमती रजनी पाटील, प्रताप सोनवणे, सुभाष वानखेडे, शिवाजीराव पाटील, योगेंद्र त्रिवेदी, राजू शेट्टी, माणिकराव गावीत, दत्ता मेघे, बळीराम जाधव, भावना गवळी, प्रतापराव जाधव, गुरूदास कामत, जयवंतराव आवळे, अविनाश पांडे, हरिश्चंद्र चव्हाण, सुरेश टावरे, संजय निरूपम, पद्मसिंह पाटील, संजीव नाईक, भाऊसाहेब वाकचौरे, सुरेश कलमाडी, ईश्वरलाल जैन, संजय पाटील, ए. टी. पाटील, हरिभाऊ जावळे, प्रकाश जावडेकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
या बैठकीत ब्रिमस्टोवॅड, नवी मुंबई विमानतळ, राज्यातील विविध रेल्वे प्रकल्प, पर्यावरण मान्यता, गृहनिर्माण, सिमाप्रश्न त्याचप्रमाणे नुकतीच झालेली गारपीट, अशा अनेक विषयांवर खासदारांनी सुचना केल्या.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा