बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३


‘ॲडव्हान्टेज विदर्भ’मुळे औद्योगिक
विकासाला चालना मिळेल : मुख्यमंत्री
 मुंबई, दि. 13 :  नागपूर येथे दि. 25 व 26 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ या औद्योगिक परिषदेमुळे विदर्भातील वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, कृषि अन्न प्रक्रिया उद्योग,  माहिती तंत्रज्ञान – जैव तंत्रज्ञान उद्योग, याचबरोबर पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ या औद्योगिक परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा आज मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनिल पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नागपूरचे महसुल आयुक्त व्ही. गोपाळ रेड्डी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या परिषदेसाठी राज्यातील, तसेच अन्य राज्यातील 150 उद्योजक प्रतिनिधींची व गुंतवणुकदारांची उपस्थिती अपेक्षित आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात 130 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यावरुन विदर्भात येण्यास उद्योजक मोठी उत्सुकता दाखवित आहेत, हे स्पष्ट होते. देशातील मध्यवर्ती स्थान, मिहानसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, पायाभूत सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उपलब्ध मनुष्यबळ यामुळे या भागाचा विकास पुढील काळात अत्यंत वेगाने होणार आहे. याला चालना मिळण्यासाठीच ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ या औद्योगिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
या परिषदेमध्ये वस्त्रोद्योग, कृषि अन्न प्रक्रिया, वाहन उद्योग, माहिती व जैव तंत्रज्ञान, पर्यटन आदी विषयांवर सादरीकरण व चर्चासत्रे ठेवण्यात येणार आहेत. तसेच, सहभागी उद्योजकांना वस्त्रोद्योग, उद्योग आणि पर्यटन धोरणाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. परिषदेच्या पूर्वतयारीबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा