सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३


मुंबई मध्ये 150 किमी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारणार;
एमएमआरडीए आणि ब्रिटनमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
मुंबई दि.18 फेब्रुवारी : मुंबई तसेच लगतच्या प्रदेशात 150 किमीचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याचे महत्वाकांक्षी नियोजन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने तयार केले असून लंडनमधील जगप्रसिध्द अशा ट्रान्सपोर्ट फॉर लंडन या मेट्रो रेल चालविणाऱ्या अनुभवी कंपनीसमवेत आज या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच ब्रिटनच्या उच्चस्तरीय व्यापारी शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. ब्रिटनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व तेथील मंत्री श्री. ग्रेगरी बार्कर यांनी केले.
आज ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरॉन मुंबईत असून त्यांच्या समवेत हे शिष्टमंडळ देखील आले आहे. एमएमआरडीए आयुक्त राहुल अस्थाना आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या कॅपिटल प्रोग्रामचे डायरेक्टर डेव्हीड वॅबोसो यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
            या सामंजस्य करारामुळे मुंबई तसेच सभोवतालच्या परिसरात 150 किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यास मदत होईल.
            एमएमआरडीएने शहरामध्ये 150 किमीच्या मेट्रो रेल्वे जाळ्याचा आराखडा तयार केला आहे. या व्यतिरिक्त एका सर्वंकष अशा परिवहन अभ्यासगटाने मुंबईमध्ये 300 किमीचे मेट्रो रेल नेटवर्क असावे अशी सूचना केली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातंर्गत 146 किमी लांबीचे 9 लाईन्सचे मेट्रो नेटवर्क उभारण्यात येईल. यात 3 मार्गांचे 33 किमीचे नेटवर्क हे भूमिगत असेल. भूमिगत मेट्रो उभारणीचा अनुभव एमएमआरडीएला नाही मात्र ट्रान्सपोर्ट फॉर लंडन कंपनीला भूमिगत रेल्वे चालविणे व व्यवस्थापनाचा 150 वर्षांचा अनुभव आहे.त्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूकीत अमूलाग्र आणि अत्याधुनिक बदल होतील.
महाराष्ट्राचे गुंतवणुकदारांना आकर्षण – मुख्यमंत्री
       यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये मोठ्या कंपन्यांमार्फत होत असलेली गुंतवणूक व महाराष्ट्र देशामध्ये औद्योगिक विकासात पुढे असल्याची माहिती ब्रिटीश शिष्टमंडळाला दिली. मुंबई महानगर प्रदेशामध्ये तसेच राज्यामध्ये अनेक प्रकल्पांमध्ये ब्रिटीश कंपन्यांचा यापूर्वीच बराच मोठा सहभाग आहे. यापुढे पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य, शिक्षण, वित्तीय सेवा क्षेत्र, व रिटेल या क्षेत्रात ब्रिटीश कंपन्यांचा सहभाग राज्यामध्ये होऊ शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रकल्प व्यवस्थापन, नागरी प्रशासन त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण वित्तीय व्यवस्थापन यातील तज्ज्ञांची आम्हाला आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी सांगितले.
            महाराष्ट्र हे देशामध्ये आकारमान व लोकसंख्येच्या आधारावर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून येथे असलेल्या पायाभूत सुविधा, वीज उपलब्धता कुशल तांत्रिक मनुष्यबळ या बाबी परदेशातील कंपन्यांना गुंतवणूक करण्याकरिता आकर्षक अशा आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
            या सामंजस्य कराराच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया व इतर अधिकारी उपस्थित होते. 
                                                                        00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा