ब्रिजस्टोन
टायर निर्मिती कंपनीमुळे
चाकणच्या
मोटार उत्पादन केंद्राला अधिक चालना
- मुख्यमंत्री
पुणे, दि. 5 : चाकण हे
देशातील सर्वात मोठे मोटार निर्मिती केंद्र बनले असून टायर्स आणि रबर उत्पादनातील
जगातील सर्वात मोठी ब्रिजस्टोन कंपनी येथे सुरु झाल्यामुळे मोटार कंपन्यासाठी अतिशय चांगली सुविधा निर्माण
झाली असून यामुळे या उद्योगाच्या वाढ़ीला अधिक चालना मिळेल. असे प्रतिपादन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
ब्रिजस्टोन
इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या चाकण प्रकल्पाच्या शुभारंग प्रसंगी मुख्यमंत्री
बोलत होते. यावेळी ब्रिजस्टोन कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी काझुहीसा निशिगाई, मुंबई स्थित जपानचे कौन्सील
जनरल कियोशी असाको,महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंड्ळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
भुषण गगरानी,मनुष्य बळ विभागाचे संचालक अजय सेवेकरी उपस्थित होते.
युरोपीय देश,
अमेरिका या देशांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. मात्र भारताची अर्थ
व्यवस्था अनेक वित्तीय संकटाचा सामना करुनही अतिशय उत्तम आहे. त्यामुळे मोठ मोठे
उद्योग भारताकडे संधी म्हणून बघत आहेत. पुणे हे देशातील मोटार निर्मितीचे मोठे
केंद्र बनले आहे. अतिशय उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यात असल्यामुळे या
ठिकाणी अतिशय कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. जपानची उत्तम कार्य संस्कृती, तेवढेच
उत्तम मनुष्य बळ सांभाळण्याचे कौशल्य या जोरावर हा प्रकल्प त्यांच्या मध्यप्रदेश
मधील इंदोरच्या प्रकल्पाला अल्पावधितच मागे टाकेल आणि यशस्वी होईल असा विश्वास
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्या सावरदरी
ता. खेड मध्ये आपण हा प्रकल्प सुरु केला आहे, तिथल्या स्थानिकांच्या विकासाला
प्राधान्य द्यावे. हा विकास पाहून या कंपनीमुळे आमची प्रगती झाली अशी भावना
स्थानिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे असा प्रयत्न आपल्या कंपनीकडून व्हावा अशी
अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रकल्पाचे
सर्व टप्पेपूर्ण होतील तेंव्हा त्याची उत्पादन क्षमता 10 हजार पॅसेंजर कार रॅडिकल
टायर्स आणि 300 ट्रक बस रॅडिकल टायर्स
प्रत्येक दिवशी तयार होतील. या कंपनीच्या माध्यमातून 1800 हजार लोकांना रोजगार
उपलब्ध होईल असे सांगून ब्रिजस्टोन कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी काझुहीसा निशिगाई यांनी महाराष्ट्र शासनाने या
प्लांटसाठी अतिशय चांगले सहकार्य केल्याबध्दल आभार व्यक्त केले. मुंबई स्थित
जपानचे कौन्सील जनरल कियोशी असाको यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
भूषण गगरानी यांनी यावेळी महाराष्ट्राचे उद्योग धोरण स्पष्ट करुन अधिकाधिक जापनीज
कंपन्यांनी ब्रिजस्टोनची भरभराटी पाहून आमच्या राज्यात गुतवणूक करावी असे आवाहन
केले. जपानी भाषेत जपानच्या अधिकारी आणि शिष्ट मंडळाशी गगरानी यांनी यावेळी संवाद
साधला.
यावेळी कंपनी
तर्फ़े मुख्यमंत्री सहायता निधीला 10 लाख रुपायाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
करण्यात आला. यावेळी कंपनीच्या परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिका-यांबरोबर कंपनीची पाहणी केली.
0000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा