सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३


आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या शुभारंभाचा मान महाराष्ट्राला
ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे 6 फेब्रुवारीला
सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा
मुंबई, दि. 4 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या शुभारंभाचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला असून ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे दि. 6 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे राष्ट्रीय सल्लागार परीषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आजाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उप मुख्यमंत्री अजीत पवार, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी या मान्यवरांच्या उपस्थितीत पालघर येथील स. तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी 12. 00 वा. हा सोहळा होणार आहे.
        महाराष्ट्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 0 ते 6 वयापर्यंतच्या अंगणवाडीतील बालकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि 6 ते 18 वर्षादरम्यानची बालकांची तपासणी शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत केली जात होती. राज्याच्या या अभिनव योजनेचे केंद्र शासनाने कौतुक करून संपुर्ण देशभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांना एकाच छताखाली समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, लवकर निदान व वेळेवर मोफत उपचाराचा समावेश या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात करण्यात आला आहे. दरवर्षी 27 कोटी बालकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
        या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे बालकांचा मृत्यू दर कमी करणे आणि कुपोषण कमी करण्यात मदत होईल. या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी बालकाची तपासणी करतील. प्राथमिक आरोग्य केंद्रावर जी नवजात बालके आहेत त्यांना तसेच घरी असलेल्या मुलांपर्यंत हा कार्यक्रम पोहाचणार आहे. जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 1 पुरुष आणि 1 स्त्री अशा दोन वैद्यकीय अधिकारी, 1 औषध निर्माता, परीचारीका अशी  टिम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी तीन स्वतंत्र पथके नेमण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासाठी एकुण 1130 स्वतंत्र तपासणी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे राज्यातील लाभार्थी
अंगणवाडी केंद्र-  1 लाख 46
0 ते 6 वयोगटातील अंगणवाडीतील बालके- 77 लाख 52 हजार 813
कार्यक्रमांतर्गत समाविष्ट एकूण शाळा- 82,098
शालेय वयोगटातील 0 ते 18 वर्ष गटातील विद्यार्थ्यांची संख्या-  1 कोटी 18 लाख
        ठाणे जिल्ह्यापासून सुरू ह्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 0 ते 6 वयोगटातील 2 लाख 64 हजार अंगणावाडीतील बालकांची तपासणी करण्यासाठी 50 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
अजय जाधव..4.2.2013

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा