सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३


नागपूर येथे अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल
उभारण्यासाठी येत्या 8 दिवसात केंद्र शासनास प्रस्ताव
मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा असलेले कॅन्सर हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि हे हॉस्पिटल कॅन्सर वरील उपचारासाठी करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रीडमध्ये येण्यासाठी येत्या आठवड्याभरात केंद्र शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
नागपूर शहराच्या विविध प्रश्नांबाबत खासदार श्री.विलास मुत्तेमवार यांच्या विनंतीवरुन मुख्यमंत्री चव्हाण यांनी नागपूर विभागातील सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.  या बैठकीत नागपूर शहराच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाग आणि पिली नदी यातून वाहून जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी दुषित होत असल्याचे आढळून आले आहे.  हे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान कार्यक्रमातंर्गत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या नद्यांचा राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पातंर्गत 118 कोटी रुपयांचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
31 मार्च पूर्वी मिहानचे भूसंपादन पूर्ण
          मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना ले-आऊट करून पर्यायी भूखंड वाटप करण्याची संपूर्ण कार्यवाही 31 मार्च 2013 पूर्वी पूर्ण करण्यात येईल.  तसेच या प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादनाचे कामही याच मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.  विदर्भातील अतिशय महत्वकांक्षी आणि नागपूरच्या औद्योगिक विकासासाठी आधारभूत ठरणारा प्रकल्प आहे. सुमारे 4 हजार 354 हेक्टर आर क्षेत्रावर नागपूर शहरालगत हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीकरिता अद्ययावत विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र, आयटी पार्क, निवासी विभाग आदी प्रकल्प विकसित केले जात आहेत.
          अर्बन लँड सिलिंगच्या कायदेशीर प्रक्रीया पूर्ण न करता शासनाच्या नावे करण्यात आलेल्या मिळकतींबाबत शासनाने यापूर्वीच धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अशा मिळकतीवरील शासनाचे नाव चुकीने लागले असेल तर ते तातडीने कमी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  तसेच अनधिकृत ले-आऊट असलेल्या तसेच नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर यापूर्वीच बांधकाम झालेल्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याची आग्रही मागणी  खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली. ही बाब तपासून शासन योग्य तो निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  
अजनी रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे करणार
       अजनी रेल्वे स्टेशनाचा विकास करून त्याला जागतिक दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर ताजाबाद विकास करण्यासाठी इतर तिर्थक्षेत्रासारखे विकसीत करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय रूग्णालयाचा भव्य प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरीत या तत्त्वावर विकसीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.
          या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री.राजेंद्र मुळक, आमदार श्री.दिनानाथ पडोळे, नागपूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.विकास ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री.नितीन करीर, श्री.आशिष कुमार सिंह, सह सचिव श्री.शेखर गायकवाड, विभागीय आयुक्त श्री.गोपाल रेड्डी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री.प्रविण दराडे, महापालिका आयुक्त श्री.शाम वर्धने, जिल्हाधिकारी श्री.सौरभ राव उपस्थित होते.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा