महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याकांच्या योजना
कौतूकास्पद
अल्पसंख्याकांच्या विकास कार्यक्रमाला गती द्यावी
-
के. रहमान खान
मुंबई, दि. 4 : केंद्र आणि राज्य शासनामार्फत
अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या
अमलबजावणीस अधिक गती देण्यात यावी, असे केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री के.
रहमान खान यांनी आज येथे झालेल्या बैठकीत सांगितले. राज्य शासनामार्फत
अल्पसंख्याकांसाठी राबविली जात असलेली दुसऱ्या पाळीतील आयटीआय आणि पॉलिटेक्निक
प्रवेश योजना कौतूकास्पद असून ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये राबविली जाईल,
असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख
उपस्थितीत आज विधानभवनातील समिती सभागृहात ही बैठक झाली, त्यावेळी श्री. खान बोलत
होते. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान,
राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, मुख्य सचिव जयंत कुमार बॉंठीया, अल्पसंख्याक
विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती थॅंक्सी थेकेकरा, नगरविकास विभागाचे
प्रधान सचिव श्रीकांत सिंह, महिला आणि बालविकास विभागाचे प्रधान सचिव उज्वल ऊके,
गृह विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस. एस.
संधू, केंद्रीय अल्पसंख्याक विकास विभागाचे संचालक धिरजकुमार यांच्यासह विविध
विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. के. रहमान खान म्हणाले की, केंद्र शासनाचा
एमएसडीपी कार्यक्रम (मल्टी सेक्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) महाराष्ट्रातील चार
अल्पसंख्याक बहूल जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत असलेल्या
अल्पसंख्याकांसाठीच्या गृहनिर्माण, अंगणवाडी ईमारत बांधकाम, वसतीगृहांचे बांधकाम आदी
कार्यक्रमांची अंमलबजावणी गतीने करण्यात यावी. केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती
योजनेची महाराष्ट्रात चांगली अंमलबजावणी झाली असून त्यामुळे आता या योजनेतील
महाराष्ट्रातील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र
शासनामार्फत अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या दुसऱ्या
पाळीतील आयटीआय आणि पॉलिटेक्निक प्रवेश योजना, अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत
सुविधांसाठी 2 लाख रुपये निधी देण्याची योजना आदी योजना चांगल्या आणि कौतुकास्पद
असून देशातील सर्व राज्यांमध्ये या योजना लागू केल्या जातील, असे ते म्हणाले.
अल्पसंख्याकांच्या विकासासाठी विशेषत्वाने पुढाकार
घेऊन महाराष्ट्र शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून त्याचे
सकारात्मक फलित येत आहेत, असे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. विशेष
करुन दुसऱ्या पाळीतील आयटीआय आणि पॉलिटेक्निक प्रवेश योजनेमुळे अनेक अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अल्पसंख्याकांच्या सर्वच योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे ते
यावेळी म्हणाले.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा