प्रवाशांच्या सेवासुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य देतानाच
रेल्वेच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा न टाकता, अनेक नवीन
गाड्या सुरु करण्याची घोषणा करणारा, प्रवाशांची सुरक्षा आणि सेवासुविधा यांना
प्राधान्य देणारा आणि आजची परिस्थिती पाहता अतिशय समतोल असा रेल्वे अर्थसंकल्प
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सादर केला आहे. मुंबईच्या उपनगरी सेवेच्या 72
जादा फेऱ्या आणि उन्नत रेल्वे कॉरिडॉरला चालना यामुळे मुंबईकरांना निश्चितच दिलासा
मिळणार आहे. रेल्वेच्या विकासाला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे मी मनापासुन
स्वागत करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त
केली आहे.
आज संसदेत सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर
प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, 12व्या पंचवार्षिक
योजनेत मुंबईतील उन्नत रेल्वे कॉरीडॉरसाठी गुंतवणूक करण्यासंदर्भात केलेली घोषणा,
कल्याण-कर्जत दरम्यानचा तिसरा रेल्वेमार्ग आणि उपनगरीय रेल्वेला वातानुकुलित डबे
जोडणे यासारख्या निर्णयांमुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा अधिक सक्षम होईल, मुंबईला
देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या काही नव्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर रेल्वे सुरू
करणे, नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण त्याचप्रमाणे मार्गांचे दुपदरीकरण यामुळे
देखील फायदा होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांनी
सर्वसामान्य प्रवाशांवर कोणताही बोजा पडणार नाही, याची काळजी घेतली आहे.
त्याचप्रमाणे येत्या काळात आधुनिकीकरणाची कास धरून रेल्वे यंत्रणा अधिकाधिक
कार्यक्षम करण्याचे धोरण स्वागतार्ह आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला रेल्वे
अर्थसंकल्पात बॉटलींग प्लॉन्ट, प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र यासाठी
तरतूद केल्यामुळे विदर्भासारख्या भागालाही न्याय मिळाला आहे. रेल्वेमंत्र्यांनी
देशाच्या सर्व भागांचा या अर्थसंकल्पात विचार केला आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन
करतो, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा