सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३



ॲडव्हाँटेज विदर्भ परिषदेमुळे
औद्योगिक विकासाला नवी दिशा ... मुख्यमंत्री
                                                     *  उद्योजकांचा चांगला प्रतिसाद
               *  आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा शुभारंभ
                           *  18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार
                                                    *   दरवर्षी ॲडव्हाँटेज विदर्भचे आयोजन करणार
       नागपूर,दिनांक 25 : भारताच्या हृदयस्थानी असलेल्या विदर्भाच्या औद्योगिक जलद विकासाला पोषक वातावरण निर्माण करण्यासोबत उद्योजकांनाही विशेष सवलती व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून विदर्भाच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच ॲडव्हाँटेज विदर्भ ही गुंतवणुकदारांची परिषद दरवर्षी आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. उद्योजकांनी  विदर्भात सर्वाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन यावेळी केले.
       हॉटेल सेंटर पॉईंट येथे ॲडव्हाँटेज विदर्भ ही औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन झाले. यावेळी विदर्भात 18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावावर सामंजस्य करार करण्याले आले. त्यानंतर उद्योजकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
       केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल, उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया,  फिक्कीचे अध्यक्ष रसेस शहा,मारोती उद्योग समूहाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव, भेल या उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. प्रसादराव, रेमंड उद्योग समूहाचे प्रमुख गौतम हरिसिंगानिया, जिंदल उद्योग समूहाचे प्रमुख सज्जन जिंदल, श्री. शांडिल्य, देशातील नामवंत उद्योग उद्योजक, के.पी.एम.जी मार्केटींगचे प्रमुख प्रदीप उदास आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
       विदर्भाच्या भौगोलिक तसेच येथील साधन सूचितांवर आधारित उद्योगांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री  म्हणाले की, वस्त्रोद्योग, फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, पर्यटन आदी उद्योगांच्या विकासाला पोषक वातावरण असल्यामुळे नवीन औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरणात विदर्भासह मागास भागासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलतीच्या आधारावर उद्योजकांनी आपले उद्योग या भागात सुरु करावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

       विदर्भात उद्योग वाढीसाठी चांगले वातावरण असून नैसर्गिक साधन-सामुग्रीसह औद्योगिक शांतता असल्यामुळे उद्योजकांना उद्योग सुरु करतांना सर्व सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्याचे  शासनाचे धोरण आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासाला चांगल्या संधी असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, विदर्भात वाघांची संख्या वाढत आहे. तसेच समृद्ध जंगल पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. त्यासोबतच नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार विदर्भात कापसावर 100 टक्के  प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्याला चालना देण्यात आली आहे. वीज, पाणी, दळण-वळण आदी  सुविधा असल्यामुळे उद्योगाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
         नवीन औद्योगिक धोरणाबद्दल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणासंदर्भात उद्योजकांकडून सूचना आल्यास त्याचा निश्चितच विचार करून त्यानुसार अधिक व्यापक व उद्योगांच्या विकासाला सर्वसामावेशक पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
       उद्योगाच्या विकासासोबतच रोजगाराच्या संधी निर्मिती करणे महत्वाचे असून राज्यात येणाऱ्या सर्व उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देतांना रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल  या परिषदेच्या माध्यमातून उद्योगांच्या विकासासाठी चांगले वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
       केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल यांनी विदर्भाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ॲडव्हाँटेज विदर्भ हा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाने विशेष अभिनंदन करतांना सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष उद्योग उभारणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिहान या महत्वपूर्ण प्रकल्पामध्ये बोईंगसह इन्फोसिस यांनी मोठी गुंतवणूक केली असून हा प्रकल्प लवकरच नवी झेप घेईल. भंडारा येथे भेलचा 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प येत असून इतरही उद्योग येण्यास उत्सुक आहेत. राज्य शासनाने विजेच्या दरामध्ये सवलतीचे धोरण   स्वीकारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
       दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या धर्तीवर नागपूर अथवा बुटीबोरी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी स्थळ विकसित केल्यास  ऑटोएक्स्पो संदर्भातील प्रदर्शन येथे भरविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

       उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, नवीन औद्योगिक धोरणात मागास भागातील उद्योगांच्या विकासासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.   नागपूर तालुका वगळता संपूर्ण विदर्भला डी प्लस दर्जा दिला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योगांसाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यामुळे उद्योजकांनी उद्योग  सुरु केल्यास संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. तसेच बुटीबोरी येथे 50 एकर जागेवर अद्ययावत कन्व्हेंशन सेंटर सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

       प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ॲडव्हाँटेज विदर्भ या गुंतवणुकदारांच्या परिषदेचे दीप प्रज्वलीत करून उदघाटन केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषणात विदर्भातील उद्योजकांना असलेल्या संधीची माहिती दिली.
       यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक व मारुती सुजुकी उद्योग समूहाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव, भेलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी.प्रसाद राव, रेमंड उद्योग समूहाचे प्रमुख गौतम हरिसिंघानीय, जिंदल उद्योग समूहाचे सज्जन जिंदल आदींनी या परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. के.पी.एम.जी. मार्केटचे प्रमुख प्रदीप उदास यांनी विदर्भातील उद्योग उभारणीच्या विविध संधीबाबत परिषदेत सादरीकरण केले. तसेच यावेळी ॲडव्हाँटेज विदर्भ संदर्भात बिझनेस डेस्टीनेशन या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
उद्योग विभागातर्फे 16 उद्योजकांच्या उद्योग उभारणी संदर्भातील सामंजस्य करारावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 8 प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत 18 हजार 461 कोटी रुपये गुंतवणुकीच्या  प्रस्तावावर स्वाक्षऱ्या झाल्या. 
       यावेळी मंडळातील सदस्य, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, संपूर्ण देशातून आलेले उद्योजक, औद्योगिक प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोषी यांनी आभार मानले.
                                                                        ***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा