प्रशासन
लोकाभिमुख होण्यासाठी
नाविन्यपूर्ण
योजना राबवा : मुख्यमंत्री
नागपूर,दिनांक 26 : महसूल
विभागात काम करतांना बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासोबतच
प्रशासन लोकाभिमुख कसे होईल व त्याचा उपयोग सामान्य माणसाला कसा होईल यादृष्टीने
काम करा, शासन तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
दिली.
देशपांडे सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित
महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव सन्मान सोहळयात ते बोलत होते. महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, अन्न व नागरी पुरवठा
मंत्री अनिल देशमुख, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, राज्यमंत्री राजेंद्र मुळक,
मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय,
विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी यांचेसह सर्व विभागाचे आयुक्त व जिल्हाधिकारी
उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले
की, महसूल अधिकारी गौरव सन्मान दरवर्षी घेण्यात येईल. जमिनीची फेरमोजणी करण्याचा
महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून याची खूपमोठी जबाबदारी
महसूल विभागावर आहे. त्याचप्रमाणे आधारकार्डवर आधरित योजना यशस्वी करण्याची
जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. महसूल विभागातील रिक्त पदाबाबत बोलतांना
मुख्यमंत्री म्हणाले की, दहा टक्के नोकरभरतीचा प्रस्ताव पाठविल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. राज्यात
सध्या दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळाची कामे गंभीरतेने पार पाडा, अशा
सूचना त्यांनी केल्या.
राज्यसेवेत कार्यरत
असलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेची
परीक्षा देता यावी यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून त्याला लवकरच
मंजूरी मिळणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांना पाच टप्यात प्रशिक्षण देण्याची
योजना विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब थोरात यांनी नाविण्यपूर्ण योजना
राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महसूल प्रशासन राज्याचा कणा असल्याचे
सांगून दुष्काळी परिस्थिती अतिशय जबाबदारीने हाताळणार असल्याची ग्वाही त्यांनी
दिली. रिक्त जागा त्वरीत भरण्याची विनंती केली.
महसूल विभागाने गेल्यावर्षी 55 लाख जातीचे दाखले थेट शाळेत वितरीत केल्याचे
त्यांनी सांगितले. शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाला नियतव्यय वाढवून द्यावा,
अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महसूल राज्यमंत्री प्रकाश
सोळंके यांनी महसूल विभागावरील अतिरिक्त भार कमी करण्यासंदर्भात सूचना केली. मुख्य
सचिव जयंतकुमार बांठिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण व प्रशासकीय सेवा
दिवस साजरा करण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी केले. नाविण्यपूर्ण कल्पना,
कल्पनेची अंमलबजावणी, जनतेला झालेला लाभ व अनुकरणीय योजना या निकषावर
पुरस्कारासाठी निवड
करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्ण जयंती राजस्वी अभियानाअंतर्गत करण्यात
आलेल्या विविध कामावर आधारित सी.डी.चे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्या हस्ते झाले.
पुरस्कार विजेत्यांची नावे खालीप्रमाणे-
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी- डॉ. अनुप यादव, एकनाथ डवले, लक्ष्मीकांत
देशमुख, चंद्रकांत दळवी, आबासाहेब जराड, कुणाल कुमार, श्रीकर परदेशी, श्रावण
हार्डीकर, श्रीमती रिचा बागला, पी. वेलरासू, वीरेंद्र सिंह, अभिषेक कृष्णा व सौरभ
राव.
नागपूर विभाग : उपायुक्त
एम.ए.एच.खान, श्रीमती किरण कुळकर्णी, प्रकाश पाटील, प्रसाद मते, एम.एन.सपाटे,
एस.बी. जगताप, आर.एस. वाटघरे, व्ही.एन.गेडाम, श्रीमती मानसी जोशी, अमरावती
विभाग : जितेंद्र वाघ, उपविभगीय अधिकारी संजय खडसे, नायब तहसीलदार सचिन पाटील,
आर.एस.शेख, सुरेश बुटे, संजय सरागे, मोहन साठे, हरिदास भातकर. औरंगाबाद विभाग
: अजय गुल्हाने, जगदिश मिनीयार, महेश शेवाळे, एस.एम.देशमुख, विवेक मंडलिक,
एस.व्ही. शिंदे, महेश चामणीकर, एस.पी. उगले, बाबासाहेब बहिरट, शेख अफसर, नाशिक
विभाग : गणेश पाटील, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, अमोल मोरे, एस.आर. सोनवणे,
नरेश गावित, श्रीमती व्ही.एस. सावळे, नितीन डावखर, श्रावण दाबसे, कोकण विभाग
: अजित पवार, नवनाथ जरे, डॉ. संदीप माने, बी.बी. जाधव, प्रकाश जाधव, भारत फुलपगारे,
चंद्रकांत राजपूत, श्रीमती जी.सी. भाटकर, हिरालाल महाला, पुणे विभाग :
सुहास दिवसे, श्रीमती स्नेहल बर्गे, संजय पवार, एस.डी. जानराव, एस.सी. परदेशीमठ,
विनायक माने, सागर देसाई, संजय जंगम या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
पुरस्कारप्राप्त करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा