शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३


एमएमआरडीएची अधिकाधिक कामे
डिसेंबरअखेर पर्यंत पूर्ण करावीत
-         मुख्यमंत्री
मुंबई, दि.2: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेली अधिकाधिक कामे यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत आणि या चांगल्या कामाची वेळोवेळी प्रसिध्दी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आज सह्याद्री अतिथिगृह येथे एमएमआरडीतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले,  त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  या प्रसंगी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, वित्त विभागाचे प्रधान सचिव एस.के. श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, डॉ. नितीन करीर, आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थानाआणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
एमएमआरडीएतर्फे मेट्रो रेल, मोनो रेल, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (एमयूआयपी), सहार उन्नत मार्ग, भाडे तत्वावरील घरे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मिलन रेल्वे ओलांडणी पूल, पूर्व मुक्त मार्ग, विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प, (विस्तारित एमयूटीपी)मिठी नदी विकास प्रकल्प, अशा प्रकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे.  यामुळे मुंबईकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन आपल्या कामाच्या ठिकाणी जाणे - येणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
मुंबई शहरात 146 कि.मी. लांबीचे मेट्रो मार्ग उभारण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.  त्यापैकी 11.40 कि.मी. लांबीच्या पहिल्या वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर या मेट्रो मार्गाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे.  12 स्थानके असणाऱ्या या मार्गाचे बांधकाम लवकरच पूर्ण होऊन लवकरच मेट्रो रेलची सेवा मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
एमएमआरडीएतर्फे यावर्षी एकूण 5,600 कोटी रु.किंमतीचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.  यामध्ये 11.4 कि.मी. लांबीच्या सर्वोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गाचा (2,356 कोटी रु.) आणि 8.80 कि.मी.लांबीच्या चेंबूर ते वडाळा (1,500 कोटी) या मोनो रेल मार्गाचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे पूर्व मुक्त मार्ग (16.8 कि.मी. 1265 रु. कोटी-3 टप्प्यांसाठी) सहार उन्नत मार्ग  (2 कि.मी.-343 कोटी रु.)मिलन रेल्वे ओलांडणीपूल (700 मीटर 83.74 कोटी रु.)आणि अमर महल जंक्शन येथील उड्डाण पूल (1.1 कि.मी. 76.41 कोटी रु.) अशा एकूण 20.6 कि.मी. लांबीच्या अतिरिक्त रस्त्यांचा समावेश आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मेट्रो, मोनो प्रमाणेच अतिशय महत्त्वाचे असे काही रस्ते प्रकल्पही प्राधिकरणातर्फे पूर्ण करण्यात येणार आहेत.  या प्रकल्पांमुळे केवळ मुंबईतीलच नव्हे तर मुंबईबाहेर ठाणे-नाशिक, नवी मुंबई-पुणे आणि पुढे दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूकही अधिक सुरळित होणार आहे.  पूर्व मुक्त मार्ग हा संपूर्णपणे नवीन मार्ग असल्यामुळे सध्या शहरातील रस्त्यांवर पडणारा वाहतुकीचा भार बराच हलका होणार आहे.  ज्याप्रमाणे सहार उन्नत मार्ग आंतरराष्ट्रीय प्रवाशांना खुश करणारा ठरणार आहे, त्याचप्रमाणे पूर्व-पश्चिम जोडणी उपलब्ध करुन देणारा मिलन रेल्वे ओलांडणीपूल मुंबईकरांना दिलासा देणारा ठरणार आहे.  या प्रकल्पांमुळे एकूण 20 कि.मी. हून अधिक लांबीचे नवे रस्ते उपलब्ध होणार आहेत.  मिठी नदीचा विकास प्राधिकरणातर्फे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पावर 34.50 कोटी रु. खर्च केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आजपर्यंत प्राधिकरणाने 346.50 कोटी रु. खर्च केले  आहेत.
मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विरार ते चिरनेर हा बहुउद्देशीय मार्ग हे दोन महत्वाचे प्रकल्प प्राधिकरणातर्फे लवकरच हाती घेतले जाणार आहेत.
रेल्वे विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या हाती आल्यामुळे पुढील वर्षअखेर सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील उड्डाण पूल खुला केल्यानंतर अमर महल जंक्शन येथील उड्डाणपूल यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे.  हे दोन्ही उड्डाणपूल सांताक्रूझ - चेंबूर जोड रस्त्याच्या पूर्णत्वासाठी अविभाज्य घटक मानले जातात.  मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत पूर्व - पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्वपूर्ण जागेश्वरी-विक्रोळी जोड रस्ताही बांधण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्राधिकरणाच्या या सर्व प्रगतीबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि मुंबईत होणारी ही पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेळोवेळी जनतेसमोर आली पाहिजेत, त्यांची चांगली प्रसिध्दी झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा