छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक
उभारण्याबाबत सकारात्मक वाटचाल
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण *
जयंतीदिनी किल्ले शिवनेरी येथे अभिवादन
पुणे,
दि. 19 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात मुंबईनजिक
उभारण्याबाबत सकारात्मक वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना
अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन
पाटील होते. किल्ले शिवनेरी किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
श्री. चव्हाण आणि श्री. पवार यांनी छत्रपती
शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री.
चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सर्वसामान्य
जनतेचं राज्य आणलं. त्यांनी परकीय सत्ता आणि अन्याया विरोधात लढा दिला. सर्वधर्मसमभावाची
भावना रूजवली. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि त्यानुसार राज्य कारभार करणे यास
राज्य शासनाचे नेहमीच प्राधान्य राहील.
श्री.
चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्याबाबत ग्रामविकास
तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी
अरबी समुद्रात जागेबाबत पाहणीही केली आहे. मुंबईच्या चौपाटीपासून दोन किलोमीटर आत समुद्रात
स्मारक उभे करता येईल, असा त्यांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. स्मारक उभारण्यासाठी विविध
प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात. याबाबतच्या सर्व बाबींचा विचार करून सकारात्मक
वाटचाल सुरू आहे.
मराठा समाजास आऱक्षण देण्याच्या मागणीबाबत कोणाच्याही आरक्षणामध्ये गदा
न आणता याबाबत काय तोडगा काढता येईल, यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती
नियुक्त करण्यात आली असून त्यांचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर होणे अपेक्षित आहे,
असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किल्ले शिवनेरी आणि इतर सर्व किल्यांचा
विकास करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
करण्यात येईल. मात्र किल्ल्यांचा विकास करताना नवे बांधकाम हे मूळ बांधकामाशी सुसंगत
असायला हवे, असे सांगितले.
यावेळी आमदार विनायक मेटे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,
जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, अतिरकित्
जिल्हाधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख मनोजकुमार लोहिया आदी उपस्थित होते.
यावेळी महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच राज्याच्या विविध भागातून
आलेले शिवप्रेमी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा