सोमवार, २१ जानेवारी, २०१३



सहकारी संस्थांच्या मजबूती करणासाठी
सहकार कायद्यात बदल करणार
                                                           मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण 
सांगली दि. 21 : राज्यातील सहकारी संस्थांची आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांच्या मजबूती करणासाठी   सहकारी कायद्यात बदल करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
        सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कै. गुलाबराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी आयोजित केलेल्या सहकार मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. तर मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील , सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील , गृह राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
        केंद्र शासनाने 97 व्या घटनादुरुस्तीमध्ये सहकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या स्वायत्तेतेवर बंधने येणार असून शासनाचा अंकूशही कमी होणार आहे यासाठीच सहकार कायद्यात राज्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगून यावर्षी पीक कर्जासाठी 25 हजार कोटीचे वितरण करण्यात आले आहे. असे सांगितले.

105 उपसा जलसिंचनाकरिता 2200 कोटीचा प्रस्ताव
        राज्यामधील दुष्काळी भागातील तलाव भरुन घेण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी 105उपसा  जलसिंचन योजनाकरिता 2200 कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविला असून पिण्याचे पाणी देण्यासाठी कटु निर्णय शासनास घ्यावे लागणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमुद करुन वेळ प्रसंगी इतर विकास कामांचा निधीही दुष्काळी भागाकरिता वापरला जाईल असे ते म्हणाले. जतच्या पूर्व भागाच्या गावांकरिता हिरेपडसलगी योजनेकरिता तसेच आटपाडी तालुक्यास पिण्याचे पाणी देण्याकरिता 73 कोटी रुपये देण्याबाबत कटिबध्द आहे असे सांगितले.
        कै. गुलाबराव पाटील यांनी शेळी मेंढ्या   द्राक्ष बागयतदार यांच्यासाठी कल्पतेने योजना राबविल्या त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये शिस्त घालून दिली होती असे गौरवउद्गार मुख्यमंत्र्यांनी काढून आज सवंग लोकप्रियतेपोटी  बँका कर्ज वाटतात त्यामुळे राज्यातील 6 बँका अडचणीत आल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
        जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणात कै. गुलाबराव पाटील यांनी बँक कार्यक्षमपणे चालवून राज्यात अग्रेसर ठेवली होती. त्यांना सहकाराचा उत्तम अभ्यास होता. चुकीच्या व्यवस्थापन पध्दतीमुळे राज्यातील काही संस्था अडचणीत आल्या आहेत असे त्यंानी सांगून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत त्यासाठी जिल्ह्यातील आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले.
        सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात जिल्ह्या बँकेवर प्रशासक आल्यामुळे आर्थिक शिस्त आली बँकेस 20 कोटीचा नफाही झाला आहे असे सांगून राज्यात सहकार चळवळ राबविण्यात कै. गुलाबराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे असे गौरवउद्गार काढून केंद्र सरकारने पारीत केलेला नवा सहकार कायदा राज्यात राबविण्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे असे सांगितले . गट सचिवांच्या प्रश्नाबाबतही लवकरच मार्ग काढला जाईल असेही ते म्हणाले.
        सहकारी संस्थांमध्ये  काम करताना प्रत्येकाने संस्था ही आपली आहे हा विचार समोर ठेवून काम करण्याची गरज असून गुलाबराव पाटील यांनी नेहमीच संस्थेच्या हितास प्राधान्य दिले असे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगून सहकारी संस्थापूढे आज खाजगीकरणाची मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला तोंड देण्यासाठी सक्षमपणे कार्यक्षम पणे सहकारी संस्था चालविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कै. गुलाबराव पाटील यांनी घालून दिलेल्या दिशेने काम करण्याची गरज आहे असे सांगितले.
        या मेळाव्यात शिरोळचे आमदार आप्पासाहेब उर्फ सा. रे . पाटील यांना 2012 चा तर माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे  यांना 2013 चा कै. गुलाबराव पाटील पुरस्कारने सन्मानित तर  कै. गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कारने मोहनराव कदम यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेच्या संकेत स्थळाचे माहिती पटाचे कळ दाबून मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला तसेच यावेळी काढण्यात आलेल्या सहकार तपस्वी या स्मरणीकेचे प्रकाशन श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
        कै. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राज्यातील सहकाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला पुरस्कार देण्यासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कडे या कार्यक्रमात सुपुर्द केला. जत तालुक्यातील जनतेच्या वतीने जत शहरास पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा आमदार प्रकाश शेंडगे यांनी शाल , श्रीफळ पुष्पहार घालून यावेळी सत्कार केला. 
        बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास सांगली , मिरज  आणि  कुपवाड महानगरपालिकेचे महापौर इद्रीस नायकवडी , जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमूख, आमदार सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे , मानसिंगराव नाईक, संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अनिल बाबर, शिवाजीराव नाईक, श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील, सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी,  विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  बँकेचे अधिकारी, सभासद , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-000000-

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा