सोमवार, २१ जानेवारी, २०१३

म्हैसाळचे पाणी बिरनाळ तलावात
सांगली : तहानलेल्या जत शहरवासियांची तहान भागविण्यासाठी कृष्णा नदीचे अर्थात म्हैसाळचे पाणी जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात  पोहोचले आहे, जतचे तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी ही माहिती दिली.         सलग तीन वर्षांपासून जत तालुक्यात भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. प्यायला पाणी नसल्याने जतकरांचे हाल होत आहेत. जत शहराला पाणीपुरवठा करणारा बिरनाळ तलाव, यल्लमा देवीजवळील विहीर व गौसिद विहिरीने तळ गाठला आहे. 40 हजार लोकसंख्या असलेल्या जत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 
         मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जत दौऱ्यात बिरनाळ तलावाची पहाणी केली व मुंबईला जाताच म्हैसाळचे पाणी बिरनाळ तलावात आणण्यासाठी एआयबीपी योजनेतून 25 कोटी दिले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रतापपूर ते बिरनाळ दरम्यानच्या कालव्याचे काम वेगाने सुरु झाले. बिरनाळ तलावात पाणी सोडण्यासाठी प्रशासनानेही या कामाचा पाठपुरावा केला. त्यामुळे बिरनाळ तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी दुपारी म्हैसाळ योजनेचे पाणी कंठीत दाखल झाले होते. आज ते बिरनाळ तलावात दाखल झाले आहे. बिरनाळ तलाव 25 टक्के भरण्यात येणार असून त्यानंतर हे शेगाव व अन्य तलावात सोडण्यात येणार आहे.
टँकर होणार बंद
          जत शहरवासियांना सध्या प्रतापपूर येथून अर्थात 40 कि.मी. वरुन टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. 24 हजार लिटर क्षमतेच्या 10 टँकरव्दारे प्रत्येकी 3 खेपा करुन प्रतापपूर ते जत  येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी उचलून आणून टाकतात. त्यानंतर आठवड्यातून एकदा माणसी 20 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. म्हैसाळचे पाणी बिरनाळ तलावात दाखल झाल्यामुळे जत शहराला पाणी पुरवठा करणारे टँकर बंद होणार आहेत.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा