ई- जिल्हा व ई- कार्यालय संकल्पना राज्यात राबविणार
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
सांगली दि. 21 : सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जावून हेलपाटे मारुन दाखले मिळवावे लागतात त्यासाठी त्यांना नाहक त्रास होतो व त्यांचा वेळही जातो. यासाठी राज्यात घरबसल्या इंटनेटच्या माध्यमातून दाखले देण्याकरीता ई- जिल्हा , ई- कार्यालय संकल्पना राज्यात राबविण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली.
सांगली- मिरज रोडवर विजयनगर येथे बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील, ग्रामीणविकास मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, उपस्थित होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधून लोकाभिमुख प्रशासन राबवावे असे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात नमुद करुन 21 व्या शतकाला सामोरे जाताना इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन प्रशासनाने गतीमान व्हावे व नागरिकांनी कार्यालयाकडे न येता घरबसल्या शासनाच्या सर्व ध्येय धोरणांची, निर्णयांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे त्यंानी भाषणात सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कदम यांनी या इमारतीसाठी निधी निधी देण्याकरिता जयंत पाटील यांनी चांगली मदत केली असे सांगून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक या सर्वांचे प्रश्न एैकून व समजून घेवून पालकमंत्री या नात्याने निर्णय घेत असतो आतापर्यंत भरीव काम जिल्ह्याच्या विकासासाठी केले आहे राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी पाठपूरावा सुरु आहे असे सांगितले.
ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रशासकीय इमारतीमुळे लोकांची चांगली सोय होणार आहे प्रशासकीय इमारत पुर्ण करण्यामध्ये पालकमंत्र्यांचे मोठे श्रेय आहे असे ते म्हणाले .
प्रारंभी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे शासनाचे 24 लाख रुपये वाचणार आहेत.असे सांगितले. अधिक्षक अभियंता डी. वाय. पाटील यांनी या इमारतीस 10 कोटी रुपये खर्च आला असून या ठिकाणी 30 कार्यालयांची सोय झाली आहे असे सांगितले. कार्यकारी अभियंता एम. व्ही. खद्दे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास सांगली , मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर इद्रीस नायकवडी , आमदार सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे , संजयकाका पाटील, माजी मंत्री मदन पाटील , विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत , निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील वरीष्ठ शासकीय अधिकारी, खाते प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--0000--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा