गुरुवार, १७ जानेवारी, २०१३


विदर्भ ॲडव्हान्टेजमुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला
                    मोठ्या प्रमाणात चालना : मुख्यमंत्री

     मुंबई, दि. 17 : नागपूरला पुढील महिनाअखेरीस होणाऱ्या 'विदर्भ ॲडव्हान्टेज' या दोन दिवसीय परिषदेमुळे विदर्भाच्या सर्वांगिण औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी विदर्भ ॲडव्हान्टेज या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन पुढील महिन्याअखेर करण्यात येणार आहे. विदर्भाचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी या परिषदेत उद्योजकांना आमंत्रित करण्यात येणार असून वस्त्रोद्योग, कृषी, कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाइल क्षेत्र या विषयांचा यात समावेश राहिल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
     विदर्भातील प्रश्नांबाबत अमरावती विभागातील आमदारांची बैठक श्री. चव्हाण यांनी आज मुंबईत आयोजित केली होती. उपस्थित आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, वने, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, सामाजिक न्याय मंत्री व नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, कृषि व पणन मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शिक्षण मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा,अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलढाण्याचे पालकमंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री व वाशिमचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, रोजगार हमी येाजना मंत्री व यवतमाळचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, रणजीत कांबळे, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
               या मागण्यांमध्ये मिहान प्रकल्पास गती मिळावी, विदर्भातील उद्योगांना विशेष सवलती प्राप्त व्हाव्यात, राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार 2011 -12 व 2012-13 या वर्षाकरीता असलेला विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमासाठी राखून ठेवलेला निधी उपलब्ध व्हावा, विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेल्या खारपाण जमिनपट्टयांसंदर्भात स्वतंत्र मंडळाची नियुक्ती व्हावी, 500 फूटांपर्यंत विंधन विहीरीस परवानगी मिळावी, यवतमाळ अचलपूर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज व्हावा, अमरावती- वडनेरा वाशिम रेल्वे मार्गाला प्राधान्य, लोणार येथील पर्यटन स्थळी सुविधांची उपलब्धता, विदर्भ औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात मोठे उद्योग उभारले जावेत, अमरावती विमानतळ प्रकल्प मार्गी लागावा, अमरावती व नागपूर येथे विभागीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावे, अकोला विमानतळ विस्तारीकरण व्हावे, मलकापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे ज्यादा निधीची उपलब्धता व्हावी, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अति विशेषोपचार  दर्जा (सुपर स्पेशालिटी) मिळावा, यवतमाळ येथील औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात टेक्सटाईल पार्क व्हावा, खडक पुर्णा धरणाची उंची वाढविण्यात यावी, बुलढाणा जिल्हयात एमआयडीसी क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, विदर्भातील विविध शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे भरली जावीत, बुलढाणा येथे ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानात वाढ व्हावी, बोधवड उपसा जलसिंचन योजना कामास सुरुवात व्हावी, बुलढाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती व्हावी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात भरपाई या मागण्यांचा समावेश आहे.
                या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये सर्वश्री सुभाषराव झनक, डॉ. राजेंद्र शिंगणे, विजयराज शिंदे, विरेंद्र जगताप,  प्रकाश डहाके, अनिल बोंडे, हरिभाऊ इंगळे, चैनसुख संचेती, गोपीकिशन बाजोरिया, बळीराम शिरस्कर, वामनराव कासावार, संजय गावंडे, केवलराम काळे, बच्चू कडू, निलेश पारवेकर, रावसाहेब शेखावत, विजय खडसे, राहूल बोंद्रे, प्रविण पोटे, डॉ.संजय कुटे, अभिजीत अडसूळ, वसंतराव खोटरे, दिलीप सानंदा, रवी राणा, हरिष पिंपळे, संदिप बाजोरिया, डॉ.संजय रायमुलकर आणि  श्रीमती यशोमती ठाकूर यांचा समावेश होता.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा