नवीन वर्ष शांततामय
प्रगतीचे जावो : मुख्यमंत्री
महिला, बालके व ज्येष्ठ
नागरिकांच्या सुरक्षेला
नव्या वर्षात प्राधान्य
देण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
मुंबई, दि. 31 : नवीन
वर्ष शांतता, समृद्धी आणि प्रगतीचे जावो, अशा सदिच्छा राज्यातील नागरिकांना देत
असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वर्षात महिला, बालके व ज्येष्ठ
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.
सन
2013 या नव्या वर्षानिमित्त राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा देताना श्री. चव्हाण
म्हणतात की, येणारे प्रत्येक नवे वर्ष हे नवी आशा घेऊन येत असते. उद्यापासुन सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचेही
स्वागत सर्वजण मोठ्या उमेदीने करतील, अशी आशा आहे. मात्र वर्षाच्या अखेरीस देशात
घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे जनमानस व्यथीत झाले आहे. सामाजिक सलोखा, शांतता,
सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षेची भावना असणे, ही आजची सर्वात
प्राधान्याची गोष्ट आहे. यामुळेच राज्यात सर्वत्र सुरक्षेचे वातावरण राहिल, याची
सर्वतोपरी खबरदारी घेण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.
अपकृत्ये
करणाऱ्यांना कायद्यानुसार योग्य आणि कठोर शिक्षा व्हावी, महिलांवरील अत्याचारांचे
खटले त्वरेने निकाली निघावेत, शिक्षेची अंमलबजावणी विनाविलंब व्हावी, अशी पावले
आम्ही उचलणार आहोत. यासाठी आवश्यक तेथे कायद्यात बदलही करण्यात येतील. महिलांना
कोणत्याही दडपणाशिवाय व निर्भयपणे फिरता यावे, अशी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती
आम्हाला निर्माण करायची आहे. सुरक्षा यंत्रणेला याबाबत विशेष प्रयत्न करण्याबाबत
आदेश देण्यात आले आहेत. या सर्वामध्ये अर्थातच सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याची
आवश्यकता आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा