सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२



मुंबई शहर, उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश
लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम थेट जमा करण्याच्या
योजनेचा मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 31 : विविध शासकीय योजनांची रक्कम आधार क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ संपूर्ण देशभरातील 51 जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिनी होत असून यात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
आधार या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची व अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.  महाराष्ट्रात आधार क्रमांकांसाठी 5 कोटी नागरिकांची नोंदणी झाली असून 4 कोटी 20 लाख नागारिकांना आधार कार्डाचे प्रत्यक्ष वाटप झाले आहे.  आधार क्रमांक नोंदणी महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.  आधार क्रमांकाची सांगड विविध शासकीय योजनांशी घालण्यात आली आहे.  पहिल्या टप्प्यात देशातील 51 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.  यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती आणि नंदूरबार या 6 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे.  या 6 ही जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि पालक सचिव यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ होईल.  या पथदर्शी प्रकल्पामध्ये केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात 34 योजनांची निवड केली आहे.
या सहा जिल्ह्यांमध्ये शुभारंभाच्या कार्यक्रमात निवडक लाभार्थींना त्यांच्या आधार क्रमांकानुसार विविध योजनांखाली मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.  ही रक्कम लाभार्थी बँकेचे एटीएम कार्ड वापरुन काढू शकतील.  ज्या गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी पोर्टेबल आकाराची मायक्रो एटीएम मशिन घेऊन बँकांचे बिझिनेस कॉरस्पाँडंट लाभार्थ्याच्या घरी जाऊन त्याला रोख रक्कम अदा करतील.  राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व सहाही जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून सर्व लाभार्थींचे आधार लिंकेज आणि आधार क्रमांकाशी सांगड असलेले बँक खाते उघडण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्री. राजेश अगरवाल यांनी दिली.
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा