भारतीय विद्याभवनच्या
माध्यमातून के.एम.मुंशी यांचे स्वप्न
प्रत्यक्षात आणण्याचे कार्य--राष्ट्रपती
मुंबई, दि. 30 : भारतीय विद्याभवनचे
संस्थापक कुलपती के.एम.मुंशी यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे भारतीय विद्याभवन करीत
असलेले कार्य गौरवास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या संस्थेच्या
कार्याचा गौरव केला.
भारतीय विद्याभवनच्या अमृत महोत्सवी
वर्षाचे उद्घाटन आणि संस्थेचे संस्थापक कुलपती के.एम.मुंशी यांच्या 125 व्या
जयंती वर्षाचा प्रारंभ आज येथे संस्थेच्या सभागृहात राष्ट्रपतींच्या हस्ते झाला,
त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल के. शंकरनारायणन्, न्यायमूर्ती
बी.एन. श्रीकृष्ण, भारतीय विद्याभवनचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली
देवरा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुलपती के.एम.मुंशी हे भारताचे महान
सुपुत्र होते अशा गौरवपूर्ण शब्दात त्यांचा उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, ते एक
दूरदर्शी आणि बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक,
वक्ता, कायदेपंडित असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. श्री अरविंद आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर
प्रभाव होता. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महात्माजींच्या सत्याग्रहात त्यांनी
सक्रिय सहभाग घेतला होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे एक दशक त्यांनी
भारतीय विद्याभवनची स्थापना करुन भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कृत भाषा
यांच्या महान वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य सुरु केले. भारतीय संस्कृती
आणि मूल्य यांचे महत्व देशात आणि परदेशातही भारतीय विद्याभवनच्या माध्यमातून जतन
केले जात आहे, असे राष्ट्रपती याप्रसंगी म्हणाले.
भारतीय विद्याभवनचे कार्य केवळ प्राचीन
भारतीय संस्कृती आणि परंपरा एवढ्या पुरतेच मर्यादित नसून माहिती तंत्रज्ञान
क्षेत्रातही ज्ञानदानाचे कार्य ही संस्था करीत आहे. देशात आणि परदेशातही
संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत हे गौरवास्पद असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
याप्रसंगी म्हणाले, भारतीय विद्याभवन ही आपली
समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांच्या भक्कम पायावर उभी असणारी आगळी-वेगळी अशी
संस्था आहे. केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही संस्थेने आपले कार्यक्षेत्र
विस्तारले असून बदलत्या काळानुरुप आणि समाजाच्या गरजेनुसार माहिती तंत्रज्ञानासंबंधी
शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेच्या कार्याचा आणि उपक्रमांचा गौरव करुन
मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते सुप्रसिद्ध शास्त्रीय
गायिका किशोरी आमोणकर, गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या इला भट आणि माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. नारायण मूर्ती यांना ताम्रपत्र
आणि भारतीय विद्याभवनचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
सुरुवातीला राष्ट्रपतींच्या हस्ते
महात्मा गांधी आणि कुलपती के.एम.मुंशी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
त्यानंतर राष्ट्रपतींनी दीप प्रज्वलन करुन या समारंभाचे उद्घाटन केले.
भारतीय विद्याभवनचे अध्यक्ष
सुरेंद्रलाल मेहता यांनी प्रास्ताविक भाषणात कुलपती के.एम.मुंशी आणि भारतीय
विद्याभवनच्या कार्याचा परिचय करुन दिला.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा