सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२


सिंचन प्रकल्पाबाबत जलतज्ज्ञ माधवराव चितळे
 यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती
समितीची कार्यकक्षा व सदस्यांची नावे जाहीर
मुंबई, दि. 31 डिसेंबर : राज्यातील सिंचन प्रकल्पाबाबत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या समितीची कार्यकक्षा व सदस्यांची नावे आज सरकारने जाहीर केली आहेत. समितीमध्ये सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) ए. के. डी. जाधव, सेवानिवृत्त पाटबंधारे सचिव व्हि. एम. रानडे, सेवानिवृत्त कृषि आयुक्त कृष्णा लव्हेकर  यांचा समावेश आहे. समितीचे मुख्यालय वाल्मी, औरंगाबाद येथे राहणार असून सहा महिन्यात अहवाल द्यावयाचा आहे.
समितीची व अध्यक्षांच्या नावाची घोषणा करताना या समितीची कार्यकक्षा, इतर सदस्यांची नेमणूक आणि चौकशीचा कालावधी याचा निर्णय 31 डिसेंबर 2012 पर्यंत घेण्यात येईल, असे निवेदन नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आज ही कार्यवाही करण्यात आली. समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे राहील.
1)निर्मित सिंचनक्षमता व प्रत्यक्ष सिंचितक्षेत्र, तसेच बिगर सिंचन पाणीवापर याची तपासणी करणे, प्रत्यक्ष सिंचितक्षेत्रापैकी विहिरीद्वारे, शेततळ्याद्वारे, जलसंधारण विभागामार्फत व जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचीत क्षेत्र कमी असण्याची कारणे तपासणे, 2)महामंडळांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या प्रकल्पांच्या किंमतीतील वाढ व त्याची कारणे प्रचलित नियम व अधिकारानुसार सुसंगत असल्याची तपासणी करणे, 3) प्रकल्पांच्या विलंबांच्या कारणांची तपासणी करणे, 4)मुळ प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये झालेल्या बदलाची कारणमिंमासा तपासणे व अशा व्याप्तीमुळे किमतीत झालेल्या वाढीची तपासणी करणे, 5)उपसासिंचन योजनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे, 6) जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या कामांच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना सुचविणे, 7) प्रकल्प ठरलेल्या मुदतीत व खर्चात पूर्ण होण्यासाठी उपाययोजना सूचविणे, 8) सिंचनक्षेत्रात वाढ होण्यासाठी उपाययोजना सूचविणे, 9) अनियमितता आढळल्यास जबाबदारी निश्चित करणे व योग्य कारवाई सूचविणे.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा