गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२


इंदू मिल ! मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा....
औचित्याचा आणि अस्मितेचा !
इंदू मिलचा प्रश्न मार्गी लागल्याने देशभरातील आंबेडकरी जनतेत सध्या आनंदाचे वातावरण आहे. स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी सर्वांनाच श्रेय दिले आहे. मात्र हा निर्णय होताना राजधानी दिल्लीने मुख्यमंत्रीपदावरच्या एका वरिष्ठ नेत्याने किती कौशल्याने आणि धडपडीने हा प्रश्न धसास लावला याचा अनुभवही घेतला आहे. भावनाशील मुदयांना सोडवताना किती जिद्द, संयम ठेवावा याचा वस्तुपाठही राज्यापुढे मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. गेल्या काही दिवसात औचित्यपूर्ण झालेल्या या अस्मितेच्या प्रश्‍नाला यशस्वी करताना त्यांच्या नेतृत्वाची परिपक्वता आणि राजधानीतील प्रश्‍न सोडविण्याचा अनुभव ठळकपणे अधोरेखीत झाला आहे.
इंदू मिलची जागा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी अशी मागणी तमाम आंबेडकरी अनुयायांची होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षावधी अनुयायांना या जागतिक नेत्याच्या राष्ट्रीय स्मारकाची आवश्यकता गेल्या कित्येक वर्षात जाणवत होती. प्रश्‍न आवश्यकतेसोबतच अस्मितेचा झाला ! त्यामुळे हा प्रश्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मुदयाचे कालबध्द नियोजन केले. 5 डिसेंबरला संसदेच्या दोन्ही सभागृहाने देशपातळीवर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला केलेला सलाम हा या नियोजनाला आलेले सन्मानाचे आणि सामुदायिक सहभागाचे फळ आहे.
गेल्यावर्षी 31 डिसेंबरला राज्यातील सर्व पक्षाचे नेते आणि आंबेडकरी चळवळीतील अग्रणी यांच्या सहभागातील शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. इंदू मिलच्या स्मारकाचा प्रश्न सर्वपक्षीय सहभागातून थेट राजधानीत पोहचला. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी या मागणीचे गांभीर्य हेरले. आणि तत्काळ याबाबत तत्वत: मान्यता दिली. पंतप्रधानांची तत्वत: मान्यता देणे हीच मोठी लढाई जिंकण्याचे प्रतीक होते.
या मागणीला आदराची आणि अस्मितेची जोड होती.एका जागतिक नेतृत्वाच्या प्रेरणादायी स्मारकाची ही भावनिक जबाबदारी होती.त्यामुळे या मागणीला अधिक प्राधान्य दिले जातानाच संपूर्ण तांत्रिक बाजू सोडविल्या जाव्यात,भविष्यात कुठला वाद असू नये, हा प्रकल्प वादातीत असावा अशी ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री नवी दिल्ली येथे आले की, त्यांचा संपूर्ण ताफा उद्योग भवनाच्या खोली क्रमांक 45 मध्ये कायम जमायचा. याच ठिकाणी या ऐतिहासिक निर्णयावर मुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री यांच्या सहा वेळा दीर्घ काळ बैठकी झाल्या. अनेक वेळा राज्यातील विविध प्रश्‍नांवर वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलोत, अशी माहिती मुख्यमंत्री पत्रकारांना देत असत. परंतु त्यांचे लक्ष्य एकच होते. ते म्हणजे इंदू मिलच्या जागेवरील महामानवाचे भव्य स्मारक!
        खरे तर इंदू मिल ही जागा खासगी संस्थेची. 1974 च्या सुमारास राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला ही जागा मिळाली. अशी जागा हस्तांतरित करण्यासाठी कायद्याच्या अनेक कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. त्यातही मुंबईसारख्या जागेची प्रचंड किंमत असणार्‍या ठिकाणचे हस्तांतरण म्हणजे अनेक कायदे आणि परवानगी घेणे आलेच. त्यामुळे ही बाब किती गुंतागुंतीची आहे हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात होते. त्यामुळे वस्त्रोद्योग सचिवांच्या सहभागात उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली. या समितीच्या अनेक बैठकी वरचेवर सुरु होत्या. मुख्यमंत्र्यांचा सतत पाठपुरावा आणि प्रश्‍न भावनिक असल्याने कधी कधी या बैठकीही वादळी झाल्यात. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्देशापासून थोडेही मागे हटले नाहीत. दिल्लीत आपला पूर्वानुभव आणि सत्तेतील वरिष्ठ नेत्यांच्यामार्फतही त्यांनी यासाठी प्रयत्न चालविले. केंद्रीय मंत्रीमंडळातील त्यांच्या यापूर्वीच्या छाप सोडलेल्या कर्तृत्वाचाही त्यांना यासाठी उपयोग झाला. राज्यातील विविध प्रश्न सोडविताना तो नेहमी होतोच.मात्र त्याच्या संपर्कामुळे या प्रश्नामागील भावनिक वीण त्यांना वरिष्ठ नेत्यांकडे उलगडता आली.
           मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नांना गती आली, ती गेल्या महिन्यातील आनंद शर्मा यांच्या सोबतच्या बैठकीने! या भेटीतच 6 डिसेंबरची डेडलाईन त्यांच्या मनात होती. त्यामुळे दिल्लीतला सारा प्रशासकीय ताफा यातील अडचणी दूर करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच कामी लागला होता. प्रश्न आता गतीने आणि सर्वसंमतीने सुटायला हवा याची त्यांना ओढ होती.त्याहीपेक्षा कायदेशीर अडचणीतून ही जागा मुक्त व्हावी यासाठी धडपड सुरू होती.याशिवाय या ठिकाणचे स्मारक राज्य शासनाच्या निगरानीत आणि पुढाकारात व्हावे यासाठी त्यांनी अन्य सहकारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशीही चर्चा सुरू केली होती. यावर एकमत झाले.एक भव्य स्मारक कुठल्याही व्यावसायिक वापराची तरतूद न ठेवता उभारायचे...महाराष्ट्राच्या भूमीत येणार्‍या पर्यटकांच्या स्मृतीपटलावर कायम कोरले जाईल असे ते उभारायचे! यासाठी प्राधिकरण तयार करायचे, दर्जेदार कार्य होईल यासाठी तज्ज्ञ वास्तुविषारदांची मदत घ्यायची, असे एकएक निर्णय फटाफट मार्गी लागत होते...मात्र आता निर्णय महापरिनिर्वाण दिनापूर्वी होऊ शकते काय? याची चाचपणीही सुरू झाली होती...
 2 डिसेंबरला मुख्यमंत्री दिल्लीत आले. तेव्हा त्यांच्या पुढे एकच अजेंडा होता... इंदू मिल! मात्र काही तांत्रिक बाबी पूर्ण व्हायला वेळ लागणारच! अशावेळी 6 डिसेंबरला आंबेडकरी जनतेला आपण काय उत्तर देऊ? हा प्रश्‍न होता. पुन्हा एकदा 3 डिसेंबरला तासभर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली! या भेटीत आशा पल्लवित झाल्या. दुसर्‍या दिवशी खा.एकनाथ गायकवाड यांनी खासदारांसोबत आनंद शर्मा यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी झालेत. ही चर्चा झाली तेव्हा 4 डिसेंबर उजाडला होता. या बैठकीत 6 डिसेंबरपूर्वी ही घोषणा आवश्यक असल्याचे सर्वांनी पटवून दिले.खा.भालचंद्र मुणगेकर,खा.हुसेन दलवाई यांनी यावेळी आनंद शर्मा यांना राज्यातील आंबेडकरी जनतेच्या मागणीचीही जाणीव करून दिली. आनंद शर्मा यांच्यासारख्या ज्येष्ठ, मुरब्बी मंत्र्यांनाही ही बाब लक्षात आली... मात्र एक अडचण होती. दिल्लीमध्ये संसदेचे सत्र सुरु होते. त्यामुळे हस्तांतरणाची घोषणा बाहेर करता येणे शक्य नव्हते....
प्रश्‍न सुटावा आणि थोडी कोंडी बाकी असावी ,अशी ही उत्कंठा वाढविणारी वेळ होती... मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची भेट हवी होती. एकीकडे थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावरुन सभागृहात घमासान सुरु असताना पंतप्रधानांना वेळ मागायचा कसा? परंतु चैत्यभूमीवर जमणार्‍या लक्षावधी आंबेडकरी जनतेला गोड बातमी देण्याची अधीरताही कायम होतीच. मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतला तिसरा दिवस होता. हाती यश आल्याशिवाय परतायचेच नाही असा ध्यास त्यांनी घेतला होता... शेवटी सर्व खासदार, मंत्री सार्‍यांनीच जोर लावला! मुख्यमंत्र्यांशी स्नेहाचे नाते ठेवणार्‍या पंतप्रधानांनी शेवटी संसद भवनात काही मिनिटांची भेट निश्चित झाली. साडेसहाला मुख्यमंत्री स्मित हास्याने बैठकीतून बाहेर पडले. संसद परिसरात पत्रकारांनी त्यांना गाठले . त्यांचे वक्तव्य होते... मला आशा आहे 6 डिसेंबरपूर्वी घोषणा होईल! त्यांचे विमान 4 डिसेंबरला मुंबईला रात्री 8.30 ला निघाले... तेव्हाच संसदेच्या सभागृहात दुस-या दिवशी घोषणेची अपेक्षा सर्वांना होती... 5 डिसेंबरला दुपारी बारा वाजेच्या सुमारास संसदेच्या दोन्ही सभागृहात घटनाकाराला आदरांजली व्यक्त करताना स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा झाली...आणि यासोबतच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महामानवाच्या स्मारकासाठी केलेल्या सातत्यपूर्ण धडपडीचीही यशस्वी सांगता झाली !
                      प्रवीण टाके,जनसंपर्क अधिकारी,
                         महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा