बुधवार, ५ डिसेंबर, २०१२


डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदु मिलची
जागा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यातील इंदु मिलची जागा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर हा औचित्यपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांचे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, इंदू मिलच्या जागेवर होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणजे राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या दृष्टीने अस्मितेचा प्रश्‍न आहे. ही साडेबारा एकर जागा हस्तांतरित होण्यासाठी राज्य सरकारचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. जागा प्रत्यक्षात हस्तांतरित झाल्यानंतर प्राधिकरण स्थापन करुन राष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक तिथे उभारण्यात येणार आहे. स्मारकाचा आराखडा व अन्य बाबीसंदर्भात राज्य मंत्रिमंडळ वेळोवेळी निर्णय घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी किंबहुना मानवमुक्तीसाठी केलेले योगदान अनन्यसाधारण आहे. जागेच्या हस्तांतरणापूर्वी सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्य सचिव व अन्य अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. मी स्वत: वेळोवेळी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, संयुक्त लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांची भेट घेऊन सतत पाठपुरावा करीत होतो.
इंदु मिलची जमीन सर्वप्रथम खाजगी मालकीची होती, त्यानंतर 1974 च्या दरम्यान ही जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आली, या जमिनीचा वापर उद्योगासाठी करता येईल, अशी अट होती. परंतु मी स्वत: लक्ष घालून राज्य सरकार स्तरावरचे नियम शिथील केले. त्यानंतर केंद्रस्तरावरच्या तांत्रिक बाबीविषयी तोडगा कसा काढावा, असा प्रश्न होता. परंतु एक-एक करत सर्व तांत्रिक प्रश्‍न सोडविण्यात यश मिळाले आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा