विदर्भ विकासाचा निधी अन्यत्र वळविला जाणार नाही - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 21 : विदर्भ
विकासासाठी असलेला निधी अन्यत्र
न वळविता फक्त विदर्भ विकासासाठीच
खर्च केला जाईल. विदर्भ विकासासंदर्भात पुढील महिन्यात विदर्भातील सर्वपक्षीय सदस्यांची
बैठक घेण्यात येईल असे
आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज विधानसभेत
दिले.
महाराष्ट्र विधानसभा
नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या
प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री
बोलत होते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या
आत्महत्येविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भात
शाश्वत शेतीला प्राधान्य देणे
गरजेचे आहे. विदर्भातील शेती
केवळ पावसावर अवलंबून असल्याने
यापुढे जलसिंचनाच्या कार्यक्रमाला
प्राधान्य देण्यात येणार आहे. माण
तालुक्यात जलसिंचनाचा एक पथदर्शी
प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाच्या
माध्यमातून 1 किलो मीटर पाणी
साठवले गेले आहे. या प्रकल्पाची
यशस्वीता पाहता राज्यातील 15 तालुक्यात राबवला
जात आहे हा प्रकल्प
विदर्भातही राबविला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे
म्हणाले, विदर्भात
काम करण्यासाठी अधिकारी तसेच
कर्मचारी उत्सुक नसल्याचे दिसून येत असल्याने यापुढे विदर्भात काम करण्यास
नकार देणाऱ्यांची पदोन्नती
नाकारण्यात येईल आणि त्यांच्यावर
कडक कारवाई करण्यात येईल. तसेच राज्य प्रशासकीय
सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. अशा अधिकाऱ्यांचं
पहिलं पोष्टींग विदर्भात कसं
देता येईल याचाही विचार
करण्यात येईल. विदर्भाच्या रिक्त
पदांविषयी विभागीय संवर्ग
तयार करण्यात आला असून
विदर्भातील रिक्त पदांचाही आढावा
घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गोसीखुर्द प्रकल्पाविषयी
बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मी भेटलो असून लवकरच
त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न
मार्गी लावणार आहोत. चंद्रपूर आणि
गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय
उभारणार असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक
जिल्ह्यात वैद्यकीय
महाविद्यालय उभारणार. औरंगाबाद येथील
कॅन्सर हॉस्पीटलच्या धर्तीवर
नागपूर येथे विशेष कॅन्सर हॉस्पीटल उभारणार
असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
विदर्भातील रोजगार
हमी योजनेच्या कामांविषयी बोलताना
मुख्यमंत्री म्हणाले, या कामांवर
आत्तापर्यंत 300 ते 350 कोटी खर्च
केले आहेत. हा महत्वाकांक्षी
कार्यक्रम राबविण्यासाठी नागपूरला नवीन आयुक्तालय
सुरू केले असून यामार्फत
चांगले काम सुरू असल्याचीही
माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
मिहान
प्रकल्पाच्या प्रगतीविषयी बोलताना
मुख्यमंत्री म्हणाले, मिहान
प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. इन्फोसिस तसेच
टाटा कन्सलटंसी सर्व्हीसेस सारख्या
सॉफ्टवेअर कंपनीच्या
आगमनाने सुमोर 15 हजार लोकांना
रोजगार मिळणार आहे. विदर्भात लवकरच
ॲडव्हांटेज विदर्भ
फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात येणार
असून यामध्ये वस्त्रोद्योग धोरण, विदर्भातील
सहकार तसेच कोरडवाहू शेती
संदर्भात मार्गदर्शनपर
व्याख्याने आणि इतर उपक्रम
राबविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.
विदर्भातील
पर्यटनाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाला
व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले
जाते. विदर्भातील जैविक विविधतेत वाढ
करण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील आहे. तसेच
वन्यजीव पर्यटनातून रोजगार
निर्मितीवरही भर देण्याचे आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नागपुर शहराविषयी
बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई
आणि पुण्याच्या धर्तीवर नागपुर
शहरातही मेट्रो सुरू करण्यासंदर्भात दिल्ली मेट्रोकडे
प्रस्ताव पाठविला असून महिन्याभरातच
त्याचा अहवाल प्राप्त होईल. शहराच्या विकासासाठी नो शॉपिंग
स्ट्रीट संदर्भातही लवकरच घोषणा
करण्यात येणार असल्याचीही माहिती
यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा