गुरुवार, २० डिसेंबर, २०१२


                   आमदार बच्चु कडू व श्री. रघुनाथदादा पाटील यांचे
मुख्यमंत्र्यांना सहकार्याचे आश्वासन
पुढील बैठक 4 जानेवारीला होणार : मुख्यमंत्री
          नागपूर, दि. 20 : आमदार श्री.बच्चु कडू, शेतकरी संघटनेचे श्री.रघुनाथदादा पाटील आणि त्यांचे शिष्टमंडळ यांनी आज नागपूर विधान भवनात मा.मुख्यमंत्री यांची भेट घेतली.  यापूर्वीच्या बैठकांचे संदर्भ घेऊन व त्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची चर्चा करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिष्टमंडळाला त्यांनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या मुद्दयांवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  या बैठकीला कृषी मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते.
          मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली डॉ.नरेंद्र जाधव समितीच्या अहवालातील काही मुद्दयांच्या अंमलबजावणीसाठी एक समिती गठीत करण्यात आली होती.  या समितीमध्ये कृषी, रोजगार हमी, मदत व पुनर्वसन, पशुसंवर्धन इत्यादी विभागांच्या सचिवांचा समावेश करुन आमदार श्री.बच्चु कडू व आणखी एक प्रतिनिधी यांच्या समवेत दिनांक 4 जानेवारी, 2013 रोजी बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
          शिष्टमंडळाची प्रमुख मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात मदत करण्यासाठी कायमस्वरुपी योजना असावी अशी होती.    योजना तयार करण्यापूर्वी जिल्हावार वीज वापर, खत वापर व कर्ज वितरण किती प्रमाणात होते याची माहिती एका महिन्यात संकलित करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले.  तसेच प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची शैक्षणिक पात्रता याचीही माहिती त्वरीत संकलित करुन धोरण ठरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले.
          जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय स्तरावर मा.कृषी मंत्री, मा.ग्रामीण विकास मंत्री व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष यांचे समवेत कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्याचे ठरले.  त्यातून काही परिणामकारक उपाययोजना करण्याबाबत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीबाबत, तसेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (NREGA) योजनेतून कोरडवाहू शेतकऱ्यांना  मदत  मिळण्याबाबत या बैठकीत चर्चा करता येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
          तूर खरेदी केंद्रे सत्वर सुरु करावीत व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची  वीज तोडू नये अशी विनंती शिष्टमंडळाने केली.  तूर खरेदी केंद्रे सुरु असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले.  तसेच यात काही अडचणी असल्यास त्याचे त्वरीत निराकरण करण्यात येईल असे त्यांनी  सांगितले.
मा. मुख्यमंत्री ना.श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.    *****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा