मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२


उद्योगासाठी लागणा-या जमिनीकरीता
एफएसआय वाढवण्याचा शासनाचा विचार
                                                                                           -- मुख्यमंत्री
            बुलडाणा, दि. 6 : राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील जागेची मागणी लक्षात घेवून उद्योजकांना एफ.एस.आय.(चटईक्षेत्र) वाढवून देण्याचा शासनाचा विचार आहे. या बाबत नव्या औद्योगिक धोरणात याचा समावेश असेल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.
            खामगाव औद्योगिक वसाहतीत आयोजित उद्योजकांशी चर्चेत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री संजय देवतळे तसेच उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, खामगावचे आमदार दिलीप सानंदा, आमदार सर्वश्री राहूल बोद्रे, विजयराज शिंदे, कल्याण काळे, जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष विजय अंभोरे, खामगाव उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मोहनलाल टावरी, विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड, जिल्हाधिकारी बी. जी. वाघ आदी उपस्थित होते.
            यावेळी उद्योजक संघटनेतर्फे मागण्याचे निवेदन देण्यात आले. यात खामगाव जिल्हा निर्माण व्हावा, वीज दर घटवावे, अधिक जागा आणि भौतिक सुविधा मिळाव्या, एक खिडकी योजना आदी सह अकोला विमानतळाचा विस्तार व तेथे एम.आय.डी.सी. चे प्रोदेशिक कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी आदी मागण्या होत्या.
            यावेळी बोलतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्याचे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार आहे. राज्यात सर्वत्र समान गतीने औद्योगिक विकास व्हावा अशी शासनाची भुमिका यात राहणार आहे. सोबतच लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्याने सवलती देण्याबाबतही विचार होत असल्याचे त्यांनी सांगीतले.
विमानतळ विस्तार होणार
        गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रास सर्वप्रथम पसंती असते. गुंतवणुकदारांना सोय व्हावी यासाठी विमानतळाच्या विस्ताराची योजना आहे यात अकोल्यासह आठ ठिकाणी काम होणार आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. वीज दराबाबत बोलतांना ते म्हणाले की, शेतक-यांना साधारण 3 हजार कोटींची सबसिडी दिली जाते ती  उद्योग क्षेत्रातून येते मात्र येणा-या काळात रात्री विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांना सवलतीच्या दराने वीज देण्याबाबत विचार सुरु आहे.
            कामकाजाच्या दृष्टीने लहान जिल्हे आवश्यक आहेत मात्र अशा जिल्हयांची निर्मिती केल्यावर तेथे सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी 400 कोटी खर्च लागणार आहे. बुलडाणा जिल्हयाचे विभाजन करतांना खामगावला प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले.
            बुलडाणा जिल्ह्यातील सर्व सातही औद्योगिक वसाहतींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. चिखली येथे वीज सबस्टेशनचे काम लगेच  प्राधान्याने मार्गी लावावे अशी सुचना त्यांनी उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना यावेळी केली.
गजानन सॉल्व्हेक्सचे उदघाटन
        येथून जवळच असलेल्या सुजातपूर येथील गजानन सॉल्व्हेक्सचे या कारखान्याचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्याहस्ते आज झाले. 40 कोटी गुंतवणूक असलेल्या या कारखान्यामुळे शंभरहून अधिकजणांना रोजगार मिळणार आहे.
            कापसाच्या सरकीपासून धागा वेगळा करुन त्यापासून तेल काढण्याचा हा प्रकल्प आहे. या सोबत सोयाबिनचे तेल काढून त्याच्यासोबत ढेप तयार करण्यात येणार आहे. अशा स्वरुपाचा अत्याधूनिक यंत्रणा असणारा हा राज्यातील केवळ दुसरा व विदर्भातील पहिलाच कारखाना आहे. याची क्षमता 4 हजार क्विंटल प्रतिदिन आहे.
            कोनशिलेचे अनावरण व फित कापून उदघाटन झाले. यावेळी मंत्री मंडळातील हर्षवर्धन पाटील, संजय देवतळे, राजेंद्र मुळक, आमदार दिलीप सानंदा आदीची उपस्थिती होती.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा