मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२


                                                                   
सहकार, शिक्षणाला गती देणारे नेतृत्व हरपले
--------------
शंकरराव काळे यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दु:ख
मुंबई, दि. 6 नोव्हेंबर : ज्येष्ठ नेते श्री. शंकरराव काळे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात सहकार आणि शिक्षणाच्या चळवळीचा पाया मजबूत करणाऱ्या नेतृत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी  घनिष्ट संबंध आलेल्या श्री. शंकरराव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण कार्यास स्वत:ला वाहून घेतले आणि कर्मवीरांचा वारसा पुढे चालविला.  सहकाराच्या बलस्थानांचा चांगला अभ्यास करुन त्यांनी नगर जिल्ह्यात सहकार चळवळीला शिखरावर नेले. वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, कोपरगांव सहकारी साखर कारखाना, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, ऑल इंडिया डिस्टीलर्स असो. त्याचप्रमाणे राज्य शेती महामंडळ अशा विविध संस्थांमधून महत्वाची पदे भूषवित त्यांनी अनेकांना सहकाराचा आधार मिळवून दिला.
कोपरगांव लोकसभा मतदार संघ त्याचप्रमाणे पारनेर विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतांना त्यांनी या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा पुरेपूर प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी  त्यांची  नाळ जोडली असल्याने नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागात त्यांचा लौकिक होता. शेतीच्या विकासासाठी नवेनवे प्रयोग करण्यासाठी त्यांनी कायम शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले त्यामुळे या क्षेत्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्री. शंकरराव काळे यांच्या कार्याचा गौरव केला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
स्वर्गीय श्री. शंकरराव काळे यांचे जनमानसात एक स्थान होते. नगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध कामांना आणि उपक्रमांना त्यांनी जिल्हाध्यक्ष असतांना गती दिली होती. सहकार व शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी अनेक महत्वाच्या निर्णयांना त्यांनी मार्गी लावले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी कोपरगावातील माहेगांव देशमुख या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार व्हावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा