रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२



यशवंतरावांचे जन्मगाव 'देवराष्ट्रे' हे
आदर्श गाव बनविण्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर
                   -- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
          सांगली दि. 25 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे हे जन्मगाव देशातील पर्यटकांना प्रेरणा व स्फूर्ती देणारे ठरावे यासाठी राज्यातील एक आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) बनविण्यासाठी 15 कोटी रुपये  मंजूर करण्यात आले आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज देवराष्ट्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.
          यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज देवराष्ट्रे गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण,गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
          यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराचे सुशोभिकरण व नुतनीकरण करण्यासाठी दोन कोटी 20 लाख, गावामध्ये सभागृह बांधण्यासाठी 57 लाख, अंतर्गत रस्त्यांसाठी एक कोटी 50 लाख, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी 17 लाख, व गावातील विकास कामासाठी व इतर सुविधा निर्माण करणे आदि मिळून 15 कोटी रुपयांचा शासनाने आराखडा तयार केला आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगून आणखी निधी लागला तर दिला जाईल असे स्पष्ट केले.
देवराष्ट्रे गावात सर्व विभागाच्या
योजना राबविणार
          शासनाच्या सहकार, कृषी, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आदि विभागांनीही देवराष्ट्रे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे राबवावित अशा सूचना मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी भाषणात देवून ताकारी व टेंभू योजनेकरीता केंद्राने आक्षेप घेतल्यामुळे 800 कोटी रुपये कमी मिळाले आहेत परंतु या योजना पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मी या कामात जातीने लक्ष घातले असून दुष्काळाचा कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून जत तालुक्याच्या उपसा जलसिंचन योजनेसाठी 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत असे  त्यांनी सांगितले.
          यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला असून यशवंतराव चव्हाण यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी शासनाने कृषी, सहकार विभागामार्फत परिसंवाद, मेळावे, चर्चासत्रांचे आयोजन केले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून त्यांनी केंद्रामध्ये महत्वाची चार खाती सांभाळली होती. तसेच सुरक्षा समितीचे सदस्य बरेच वर्षे ते होते असे सांगून कृषी औद्योगिक धोरण, सहकारला दिशा व पंचायत राज बळकटीकरणाला चालना देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
          विधानपरिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या भाषणात डॉ. कदम यांनी या परिसराचा कायापालट केला असून गोरगरीबांच्या व या भागातील जनतेने मांडलेले प्रश्न मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते असे सांगून देवराष्ट्रे हे गाव आदर्श बनवून राज्याच्या नकाशावर आणावे असे ते म्हणाले.

          सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य एक संघ ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती याचे स्मरण करुन आजही सांगली जिह्यातील जत, आटपाडी या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती झाली आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन द्यावा असे सांगितले.
          स्वागताध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणात देवराष्ट्रे हे गाव आदर्श (मॉडेल व्हिलेज) करण्यासाठी 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करुन टेंभू, ताकरी व म्हैसाळ योजनांना अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे निधी द्यावा असे सांगितले. यशवंतराव चव्हाण द्रष्टा व चौफेर दृष्टी असणारा नेता होता परंतु त्यांनी आपल्या आत्मचरित्रात देवराष्ट्रे परिसराचा विकास करु शकलो नाही अशी खंत व्यक्त केली आहे असे श्री. कदम यांनी सांगून 32 वर्षे दिल्लीत व देश पातळीवर  काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती असे सांगितले.

          माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दल आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.
          सोनहिरा साखर कारखान्याचे चेअरमन मोहनशेठ कदम यांनी प्रास्ताविक भाषणात स्वागत करुन टेंभू व ताकारी योजनेची कामे निधीअभावी बंद पडली आहेत असे सांगितले.
          या कार्यक्रमास सांगली,मिरज व कुपवाड महापालिकेचे महापौर इद्रिस नायकवडी, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, भारत भालके, जयकुमार गोरे, संजयकाका पाटील, ड. सदाशिवराव पाटील,प्रकाश शेंडगे, युवक कॉग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--000--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा