हिंदी चित्रपटांना सातासमुद्रापलीकडे
लोकप्रियता मिळवून देणारे
व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड -
मुख्यमंत्री
मुंबई दि २१: प्रसिद्ध हिंदी सिनेदिग्दर्शक
आणि निर्माता यश चोप्रा यांच्या निधनाने हिंदी
चित्रपटसृष्टीला जगभर लोकप्रिय करणारे यशाचा हमखास फॉर्म्युला देणारे व्यक्तिमत्व
काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक
व्यक्त केला.
भारतीय चित्रपटसृष्टीने आजवर अनेक चांगले दिग्दर्शक पाहीले, प्रत्येकाने
आपल्या कौशल्याने चित्रपट रसिकांचे मनोरंजन केले. पण यश चोप्रा त्या सगळ्याहून वेगळे
होते. त्यांनी मनोरंजनाचा एक सर्वोत्तम फॉर्म्युला आपल्या प्रत्येक चित्रपटात
वापरला. त्यांच्या चित्रपटातून हळुवारपणा, अॅक्शन
आणि भावना यांचा एक अनोखा संगम असायचा. भारतीय
संस्कृतीची महानताही त्यांनी आपल्या चित्रपटातून दाखविली. आणि त्यामुळे अगदी सात समुद्रापलीकडे
त्यांच्या चित्रपटाना लोकप्रियता मिळाली. चित्रपटसृष्टीमधील
व्यावसायिक समस्या सोडविण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. कलाकारांबरोबरच तंत्रज्ञ,
बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्या कल्याणाबाबत ते सतत जागरुक असायचे, असे श्री. चव्हाण यांनी
आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
विविध विषयांची हाताळणी कशा पद्धतीने करावी आणि चित्रपट कसा रसिकांच्या
ह्रदयापर्यंत पोहचवावा याची पुरेपूर जाण असलेल्या यश चोप्रा यांच्या निधनाने हिंदी
चित्रपट सृष्टीचे खूप नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात
म्हणतात.
-----------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा