रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२


पोलीस हुतात्मादिनी
शहीदांना आदरांजली
मुंबई, दि. 21 : गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीसांना आज, पोलीस हुतात्मादिनी भावपूर्ण वातावरणात आदरांजली वाहण्यात आली.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली.
          नायगाव पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज, पोलीस हुतात्मादिनानिमित्त संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी-जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर  उपस्थित जवानांनी बंदूका खाली करून शोकशस्त्र संचलन केले.
गेल्या वर्षभरात देशभरातील शहीद झालेल्या 570 अधिकारी-जवानांची नावे पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे आणि महेश पाटील यांनी वाचली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. चव्हाण आणि गृहमंत्री श्री.पाटील, पोलीस महासंचालक श्री. संजीव दयाळ, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. मानवंदनेनंतर पोलीस जवानांनी बंदूकीच्या तीन वेळा फैरी झाडून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अमिताभ राजन यांचेसह विविध देशांचे कॉन्सुलेट जनरल, आजी-माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
शहीद पोलीसांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस हुतात्मादिन
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी  गस्त घालणा-या 10 पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्याला पोलीस जवानांनी कडवी झुंज दिली, दुर्देवाने, या हल्ल्यात हे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच कर्तव्य आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभर 'पोलीस हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा