सहकारी साखर उद्योगाच्या
समस्या सोडविण्यास प्रयत्नशील
मुख्यमंत्री चव्हाण यांचे प्रतिपादन
पुणे, दि. 20 : विविध कारणांमुळे राज्यातील सहकारी साखर कारखाना उद्योगासमोर सध्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन साखर कारखाना उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 18 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, गाळप क्षमता विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण कामाचा आणि कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार माणिकराव ठाकरे व आमदार भारत भालके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्यातील साखर कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात समृध्दी आली आहे. सिंचन, शिक्षण, दुग्ध व्यवसाय, खरेदी विक्री संघ अशा अनेक संस्था साखर कारखाना परिसरात विकसित झाल्या. एका साखर कारखान्यामुळे परिसरांचा कायापालट झाला आहे. पण आता वारंवार पडणारे दुष्काळ, जागतिक मंदीचा होणारा परिणाम आणि सहकारी साखर कारखान्यांचे होणारे खाजगीकरण यामुळे सहकारी साखर कारखानदारीसमोर समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन निश्चितच प्रयत्न करेल.'
राज्यातील काही भागात यंदा दुष्काळी स्थिती आहे. मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात पाण्याची स्थिती खूपच चिंताजनक आहे. या परिस्थितीत पाणी वाटपात प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
पाण्याच्या टंचाईमुळे पाणी जपून वापरावे तर लागेलच पण त्याचबरोबर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील काही गावांना बारमाही पाणी द्यावे, अशी मागणी करुन खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी केली. यावेळी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांचीही भाषणे झाली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि कारखान्याच्या सर्व संचालकांच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
-------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा