सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२


माहितीच्या अधिकारासारखे कायदे
प्रशासकीय पारदर्शकतेसाठी महत्वाचे
                                      --- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

          पुणे दि. 1 : प्रशासनात पारदर्शकता यावी म्हणून निर्माण केलेले माहितीचा अधिकार, व्हीसल ब्लोअर  यासारखे कायदे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
          पुण्यातील महात्मा गांधी स्मारक निधीच्या वतीने दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
          यावेळी व्यासपीठावर गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, आ. मोहन जोशी,      आ.शरद रणपिसे,ऍ़ड. अभय छाजेड, डॉ. वि. दा. कराड, एम. एस. जाधव, माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते.
          महात्मा गांधींचे विचार युवापिढीमध्ये रुजविण्यासाठी महात्मा गांधी स्मारक निधी सारख्या संस्थांची मदत होत आहे. गांधीजींचे काम, सामाजिक, आर्थिक विचार याचा विचार केला तर त्याची व्याप्ती प्रचंड आहे. गांधीजींची सत्य, अहिंसा, बंधुभाव ही मुलतत्वे या देशाचा सांस्कृतिक वारसा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गांधींनी सत्याचा आग्रह केला पण सत्याचा दुराग्रह कधीही केला नाही असे सांगुन आज युवकांमध्ये प्रचंड निराशेचे वातावरण आहे. आजच्या व्यवस्थेबद्दल राग आहे. हे चित्र निश्चितच बदलेल, काही सुधारणा वेग घेत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने आर्थिक सुधारणासाठी अतिशय धाडशी पाऊले उचलली आहेत. याही गोष्टींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आवर्जून आपल्या भाषणात केला.
          या कार्यक्रमाच्या सुरुवातील भारतीय राज्य घटनेला अभिवादन करुन घटनेच्या प्रास्ताविकाचे किर्ती गुणाले यांनी वाचन केले. त्यानंतर 'वैष्णव जन' हे गांधीजींचे भजन सौ. शुभांगी मुळे यांनी गायले. सर्वधर्मिय प्रार्थना झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या www.mgsindia.org या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले.
          या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

                                                          0        0        0       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा