गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२


मंत्रिमंडळ निर्णय, दि. 4 ऑक्टोबर 2012.
ग्रामपंचायतीच्या राखीव जागांकरिता जात वैधता प्रमाणपत्र
सहा महिन्यात सादर करण्यास मान्यता
        ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्याची तरतूद पूर्वीप्रमाणे सुरु ठेवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
          जात पडताळणी समित्याकडील कामाचा भार प्रचंड प्रमाणात असल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणात उमेदवारांना जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही.  या परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका राखीव जागेवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्ती या प्रमाणपत्राअभावी वंचित राहू नयेत यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये ही सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
          अशा व्यक्तींना नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी आपल्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अर्ज केल्याचा कुठलाही पुरावा द्यावा लागेल. तसेच निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधतापत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करावे लागेल.
-----0----
राज्यात सरासरीच्या 89 टक्के पाऊस
राज्यात यंदा 1 ऑक्टोबरअखेर 1111.1 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या 89.1 टक्के एवढा आहे.  राज्यातील 355 तालुक्यांपैकी 41 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 88 तालुक्यांत 50 ते 75 टक्के, 130 तालुक्यांत 75 ते 100 टक्के आणि 96 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी जालना जिल्ह्यात 25 ते 50 टक्के, 10 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के (जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, पुणे) आणि 15 जिल्ह्यांत 75 ते 100 टक्के (ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, सातारा, कोल्हापूर, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया) आणि 7 जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा ( रत्नागिरी, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली) जास्त पाऊस झाला आहे.
101 टक्के पेरणी
राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 132.34 लाख हेक्टर असून आतापर्यंत 133.26 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राची तुलना करता राज्यात 101 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात हळवे भाताची काढणी सुरु झाली आहे.  तर ज्वारी व बाजरीच्या कणसात दाणे भरले आहेत. मूग व उडिद पिकांची काढणी सुरु आहे.  तर भुईमूग देखिल काढणीच्या अवस्थेत आहेत.
राज्यातील जलाशयात 65 टक्के पाणीसाठा
          राज्यात लघू, मध्यम आणि मोठे असे एकूण 2 हजार 467 असे  पाटबंधारे प्रकल्प असून आतापर्यंत या प्रकल्पात 24 हजार 426 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी 65 एवढी झाली आहे. याच तारखेला गतवर्षी जलाशयात 84 टक्के, तर 2010 मध्ये तो 84 टक्के एवढा होता. कोकण विभागात जलाशयात 90 टक्के, मराठवाडा विभागात 17 टक्के, नागपूर विभागात 90 टक्के, अमरावती विभागात 74 टक्के, नाशिक विभागात 59 टक्के तर पुणे विभागात 71 टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.
-----0-----
बाबासाहेब कुपेकर यांना मंत्रीमंडळाची श्रद्धांजली
विधानसभेचे माजी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते, श्री. कृष्णराव रखमाजीराव देसाई उर्फ बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानिमित्त राज्य मंत्रिमंडळाने आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात असे म्हटले आहे की, स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांसाठी झटण्यात गेले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती, ग्रामीण भागातील प्रश्नांची चांगली जाण असणाऱ्या सुसंस्कृत आणि शालिन नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे.
       कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यांतील कानडेवाडी (कुपे)या आपल्या गावाचे सरपंच आणि सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणुन त्यांनी आपली राजकीय कारकिर्द 1965 साली सुरु केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चारवेळा सदस्य म्हणून निवडुन आलेल्या कुपेकरांनी कृषि सभापती म्हणुन उल्लेखनीय कामगिरी केली.
          व्यवसायाने शेतकरी असलेले श्री. कुपेकर यांना शेतकरी असल्याबद्दल अभिमान होता. आधुनिक पद्धतीने शेती  यासाठी ते सतत आग्रही असत. ते एक चोखंदळ वाचकही होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे भव्य स्मारक त्यांनी कानडेवाडी येथे उभारले. आपल्या परिसराचा पर्यटनविषयक विकास व्हावा म्हणुन त्यांनी गडहिंग्लजचा सामानगड, चंदगडचा पारगड, रवळनाथ मंदिर, आजरा रामतीर्थ  यांचा जाणीवपूर्वक विकास केला. चंदगडच्यादौलत सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. ते तीनवेळा गडहिंग्लज मतदारसंघातून व एकवेळ चंदगड विधानसभेवर निवडुन आले. 2004 साली विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या पदावर काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली आणि या व्यासपीठाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला. त्यांच्या निधनामुळे राज्य एका अभ्यासु, संवेदनशील नेतृत्वाला मुकले आहे.
कुपेकर यांच्या कुटुंबियांच्या दु:खात राज्य मंत्रीमंडळ सहभागी आहे. हा शोकप्रस्ताव स्व. बाबासाहेबांच्या कुटुंबियांना पाठविण्यात आला.
-----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा