गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२




जागतिक रासायनिक उद्योगांचे भारताकडे लक्ष
                                           - प्रणब मुखर्जी

     मुंबई, दि. 4: रासायनिक उद्योगांमध्ये भारत विकास करीत असून या क्षेत्रातील जागतिक कंपन्यानी भारताकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.या उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच इतर सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय रसायन धोरण तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज येथे केले. अंधेरी येथील ललित हॉटेल मध्ये आयोजित 'सातव्या एडिशन ऑफ इंडिया केम 2012' या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
        यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय  रसायन आणि खते मंत्री एम. के. अलगिरी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीकांतकुमार झेना, फिक्की संघटनेचे अध्यक्ष आर. व्ही. कनोरिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
        राष्ट्रपती पुढे म्हणाले जागतिक रासायनिक उद्योग बाजारपेठेत भारताचे योगदान
3 टक्के एवढे आहे. अन्य प्रगत देशाच्या तुलनेत आपल्या देशात संशोधनावर करावा  लागणारा खर्च हा कमी आहे.सध्या संशोधनावर एकूण उलाढालीच्या केवळ 1 ते 2 टक्के खर्च करण्यात येतो, हा 5 ते 6 टक्के एवढा वाढविणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. या उद्योगांना प्रोत्साहन देत असताना, आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि स्वास्थ मानके राखली जातील याची या उद्योगांनी दक्षता घ्यावी.  त्याचबरोबर अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा ज्यामुळे पर्यावरण सुरक्षेसह आर्थिक उन्नतीही साधता येईल.
        तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातून रासायनिक उद्योगांशी संबंधित सर्व मुद्दयांवर चर्चा होऊन जागतिक दृष्टीकोनातून देशाला तसेच या प्रदर्शनात सहभागी झालेल्या अन्य देशानांही याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.      
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र उद्योगक्षेत्रात देशात आघाडीवर असून राज्यातील पायाभूत सुविधांमुळे पेट्रो केमिकल कंपन्यांचे उद्योग राज्यात  स्थिरावले आहेत. सकाळ ते संध्याकाळ आपण रासायनिक उद्योगाद्वारे उत्पादित उत्पादनाच्या संपर्कात येत असतो. सतत होणारे संशोधन हा या उद्योगाचा पाया आहे. आधुनिक जगात या औद्योगिक क्षेत्राचे योगदान अतुलनीय आहे.  राज्यात प्रशिक्षित अभियंत्यांचे प्रमाण मुबलक असून तांत्रिकदृष्ट्याही  राज्याने प्रगती केली आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा यासारख्या क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. लवकरच राज्य भारनियमन मुक्त होणार असून राज्याच्या मेगा प्रोजेक्ट पॉलीसीमुळे राज्यात येणाऱ्या उद्योगांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे जास्तीत जास्त रासायनिक उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
        केंद्रीय रसायन आणि खते मंत्री एम. के. अलगिरी यावेळी म्हणाले की, नजिकच्या काळात या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित असून  केंद्र शासन यासाठी विस्तृत धोरण तयार करीत आहे.
        आपल्या देशात रासायनिक उद्योग स्थापन करीत असताना उद्योगपतींनी सामाजिक बांधिलकी जपावी, पर्यावरण, आरोग्य याचबरोबर स्वच्छता आणि पाणी  यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री श्रीकांतकुमार झेना यांनी यावेळी  केल्या.
        केंद्रीय रसायन आणि खते, मंत्रालय आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 ते 6 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.
* * * * *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा