गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२



शासन, निसर्गप्रेमी संस्था आणि जनतेच्या सहभागाने
समतोल विकास साधण्याची गरज
                                     - मुख्यमंत्री
     मुंबई, दि. 4 : जैविक विविधतेचे संरक्षण करुन पर्यावरणाला बाधा न आणता वने व पर्यटन विभाग, निसर्गप्रेमी संस्था, जनतेचा सहभाग यांच्या समन्वयातून राज्याचा समतोल विकास साधण्याची गरज आहे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करु या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
        वने व पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'सँक्च्युरी एशिया' या मासिकाचे बिट्टू सहेगल आणि लक्ष्मी रमण यांनी संपादित केलेल्या 'वाईल्ड महाराष्ट्र' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, 'वाईल्ड महाराष्ट्र'चे संपादक बिट्टू सहेगल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, उद्योगपती महेंद्र कोठारी, श्रीमती उर्वी पिरामल, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती विजया मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याच्या वन्यजीव संपदेची ओळख व्हावी याकरिता 'वाईल्ड महाराष्ट्र' हे पुस्तक खूपच उपयुक्त ठरणार आहे. वन विभागात 6 हजार वनरक्षकांची झालेली भरती, 100 कोटी वृक्ष लागवड, पर्यटनातून राजेगार निर्मिती याबाबतचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, एलोरा, औरंगाबाद, अजंठा येथे विविध महावाणिज्यदूतांना नेऊन राज्यातील पर्यटनस्थळांची ओळख करुन देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील नागपूर अधिवेशनाच्यावेळी या महावाणिज्यदूतांना ताडोबा व्याघ्र प्रकल्पस्थळी नेण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पर्यटनस्थळांची ओळख जागतिक नकाशावर मोठ्या प्रमाणवर होण्यास मदत होणार आहे. 
        पर्यटन मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, पर्यटन क्षेत्राचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, ही बाब राज्याला निश्चितच भूषणावह आहे.
        संयुक्त वन व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक जनतेचा सहभाग घेतल्यामुळे वन संरक्षणाचे काम उत्तमरित्या होत आहे. इंधनासाठी स्थानिक लोकांनी वृक्षतोड करु नये याकरिता त्यांना बायोगॅस पुरविण्यात आला आहे. वनरक्षकांची भरती आणि त्यांनी पुरविण्यात आलेली साधनसामग्री यामुळे वन्यजीवांच्या होणाऱ्या हत्या आणि वृक्षतोडीस आळा बसेल, असे वन मंत्री पतंगराव कदम यावेळी म्हणाले.
        पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, वने विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
        'वाईल्ड महाराष्ट्र' या पुस्तकाचे छायाचित्रकार बैजू पाटील, रमण कुलकर्णी यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच 'वाईल्ड महाराष्ट्र' या पुस्तकाची ओळख करुन देणारे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. 'वाईल्ड महाराष्ट्र' कॉफी टेबल बुक असून त्यामध्ये राज्याला लाभलेल्या नैसर्गिक वनसंपदा आणि वन्यजीव यांचे सुरेख छायाचित्रण करण्यात आले आहे.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा